maharashtratribalnews

पावसाने पेरण्या रखडल्या

दिंडोरी l मनोज पाटील:- पश्‍चिम भागासह संपुर्ण तालुक्यात महिन्यापासून अवकाळी पावसाने थैमान घालुन शेतकर्‍यांना वेठीस धरल्याची परिस्थिती असतांनाच मृग नक्षत्राने सुद्धा अवकाळी पावसाप्रमाणेच सर्वत्र धुमाकुळ घातल्याने परीसरासह तालुक्यातील पेरण्या रखडल्याचे दिसत आहे.
       निसर्गाच्या ऋतुचक्रा प्रमाणे मृग नक्षत्रात खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तुर, मुग, भुईमुग, मका या पेरण्या शेतकरी नेहमी प्रमाणे करीत असतो. परंतु जवळपास दिड महिन्यापासुन पावसाची सतत दमदार हजेरी लावली आहे. परिसरातील शेतकर्‍यांना शेतीच्या मशागती करण्यासाठी पावसाची उघडीप मिळुन पुरेशी वेळ न मिळाल्याने सर्व पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे खरेदी केलेले बियाणे बियाणे वाया जाईल कि काय ? असा गंभीर प्रश्‍न आता शेतकर्‍यांना सतावीत असल्याच्या चर्चा ठिकठिकाणी रंगु लागल्या आहेत. मृग नक्षत्र म्हणजे पेरणीसाठी शेतकर्‍यांची एक प्रकारे पर्वणीच मानली जाते. परंतु जवळपास मृग नक्षत्र संपत येवुन सुद्धा मशागत आणि पेरणीलायक वापसा झालेला नाही. ज्या नक्षत्रात सतत दमदार पाऊस असतो ते आर्द्रा नक्षत्र तोंडावर आल्याने वरच्या पावसावर अवलंबुन असणारा सर्व सामान्य शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नैसर्गिक काळ ओढावल्याचे शेतकरी बोलत आहेत. सध्याच्या आधुनिक आणि तांत्रिक युगात बैलांच्या सहाय्याने करण्यात येणारी शेती बर्‍यापैकी लोप पाऊन जवळपास 90 टक्के शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत असल्याने त्याच्या हिशोबात वापसा होऊन पाऊस थांबला तरच थोडीफार पेरणी होऊ शकते नाहीतर पेरणी होणे अशक्यच असल्याचे शेतकरी बोलत आहेत. अशा या परिस्थितीत टोमॅटो लागवडीसाठी लागणार्‍या बेड तयार करणे हे कामे सुद्धा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना अजुन करता आले नाही. टोमॅटो लागवडीवर सुद्धा काहीसा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुहेरी संकट आल्याचे दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने