पेठ l प्रतिनिधी : -धरमपूर–पेठ–नाशिक मार्गावरील कोटंबी घाटात अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकमधून तब्बल १३,५५,४४० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा तसेच १५ लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २८,५५,४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात जिल्हा ग्रामीण विशेष पथकाला यश आले आहे.
ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरातमधून महाराष्ट्रात विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक पेठमार्गे नाशिककडे होणार असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार कारवाईचे नियोजन करण्यात आले.
त्याअनुसार पो.नि. रविंद्र मगर, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पो.हवा. कैलास बागुल, किरण आहेर, पो.कॉ. श्रीराम वारुंगसे यांच्या पथकाने कोटंबी घाट परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित आयशर ट्रक (क्रमांक MH 04 LE 6974) रोखून तपासणी करण्यात आली. ट्रक चालक दिपक संजय काळे (रा. बोधेगाव, ता. दारवा, जि. यवतमाळ) याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने पुढील तपास सुरू केला.
वाहनावरील निळ्या ताडपत्रीखालील जागा तपासताना ट्रकची बाहेरील लांबी आणि आतील खोलीतील फरक पोलिसांच्या नजरेत भरला. ट्रक पेठ पोलिस ठाण्यात आणून तपासणी केली असता, मध्यभागी तयार केलेला गुप्त चोरकप्पा आढळला. तो उघडताच मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व्यवस्थित रचून ठेवलेली दिसून आली.
जप्त केलेल्या मद्यसाठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे:
मॅकडॉल नं. १ व्हिस्की – ३४ खोके – १,६३२ बाटल्या – किंमत ₹३,५९,०४०
रॉयल चॅलेंज व्हिस्की – ३ खोके – १४४ बाटल्या – किंमत ₹९६,०००
रॉयल स्पेशल प्रीमियम व्हिस्की – २० खोके – ९६० बाटल्या – किंमत ₹२,११,२००
रॉयल स्टॅग – १० खोके – ४८० बाटल्या – किंमत ₹१,२०,०००
जॉन मार्टीन व्हिस्की – ४१ खोके – १,९६८ बाटल्या – किंमत ₹४,३२,९६०
डीएसपी ब्लॅक – ३ खोके – १४४ बाटल्या – किंमत ₹३०,२४०
रॉयल चॅलेंज – २५ खोके – १,२०० बाटल्या – किंमत ₹९६,०००
तसेच १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक आणि १०,००० रुपये किमतीचा सॅमसंग मोबाइलही जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹२८,५५,४४० एवढी आहे.
या प्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात अवैध दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. द्वारकानाथ गोंदके पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या मार्गावर करंजाळी जवळ दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरूपी तपासणी नाके असतानाही यापूर्वी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मोठ्या खर्चाने उभारलेल्या तपासणी नाक्यांवर प्रत्यक्षात काही कारवाई होत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.