दिंडोरी l वैभव पगार :-"आरोग्य हाच खरा खजिना आहे, आणि ग्रीन जिम हे त्या खजिन्यापर्यंत पोहोचण्याचं दार असल्याचे प्रतिपादन मविप्र समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले.
दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या ग्रीन जिम च्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्रवीण नाना बोलत होते.
ते पुढे म्हणाले मविप्र शिक्षण संस्था केवळ पुस्तकापुरते ज्ञान देणे एवढेच आमचे उद्दिष्ट नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी - शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक – अशा चौफेर वाटचालीसाठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत.
आज आपण पाहतो की, मोबाईल, स्क्रीन, आणि बसून राहण्याच्या सवयींमुळे लहान वयातच मुलांमध्ये आळशीपणा, स्थूलपणा आणि आरोग्यविषयक अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ‘ग्रीन जिम’ ही केवळ एक सोय नाही, तर ती एक गरज आहे – जी विद्यार्थ्यांना मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात, खेळता-खेळता आरोग्यदायी जीवनशैली शिकवते.
विद्यार्थ्यांनो, ही जिम केवळ पाहण्यासाठी नाही, तर दररोज वापरण्यासाठी आहे. व्यायाम म्हणजे शिक्षणाचाच एक भाग आहे. जसे तुम्ही दररोज वर्गात बसता, तसेच ग्रीन जिममध्येही वेळ द्या – शरीर निरोगी राहील, मन एकाग्र राहील, आणि यश तुम्हाला अटळ मिळेल.
यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, शिवाजी भाऊ जाधव, करंजवण चे माजी उपसरपंच रवींद्र मोरे, नगरसेवक सुजित मुरकुटे, बंडू भाऊ भेरे, मनोज मोरे,प्राचार्य शरद शेजवळ, सेवक सोसायटीचे संचालक बाबा मोरे, डीएड कॉलेज चे प्राचार्य डॉ संजय काळोगे, उपप्राचार्य उत्तम भरसठ,पर्यवेक्षक रावसाहेब उशीर, यशवंत दाणी, पुरुषोत्तम पगारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले.प्रास्तविकात ग्रीन जिम च्या किट ची माहिती सांगितली. यावेळी प्रवीण नाना जाधव यांनी ग्रीन जिम चे श्रीफळ, पूजन व फित कापणे हे सर्व स्वतः न करता विद्यार्थ्यांना बोलावून विद्यार्थ्यांच्या व क्रीडाशिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व माध्यमिक, कॉलेज विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार क्रीडाशिक्षक भाऊसाहेब रायते यांनी मानले.