बा-हे l नामदेव पाडवी :- नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक यांच्या तर्फे दिला जाणारा मानाचा, सन्मानाचा कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार २०२६ उपक्रमशील शिक्षक पुंडलिक नारायण खैरनार यांना जाहीर झालेला आहे.
श्री.पुंडलिक नारायण खैरनार (प्राथमिक शिक्षक ) यांचे मुळ गाव सटाणा तालुक्यातील श्री शंकर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अंतापूर हे गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण ,जीवन शिक्षण विद्यामंदिर अंतापुर येथे झाले. माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय अंतापुर येथे झाले. प्राथमिक शिक्षक बोरसे नाना, माध्यमिक शिक्षक चंदन आर.डी., के.बी.भामरे यांच्या सानिध्यात पूर्ण झाले. अध्यापक विद्यालयाच्या जडणघडणीत शांताराम अण्णा (निवृत्त प्राथमिक शिक्षक ) ह.भ.प. अर्जुन जिभाऊ यांचा मोलाचा वाटा आहे. शांताराम अण्णां यांचे असे मत होते की, श्री.पुंडलिक खैरनार हा गुणी विद्यार्थी शिक्षक झालाच पाहिजे. यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले व वेळोवेळी योग्य मार्गदर्शनहि केले. श्री.खैरनार यांची प्रा.शिक्षक म्हणून पहिली नेमणूक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अतिशय दुर्गम भागात तुंग, कोथुर्णे येथे झाली. कोथुर्णे गाव म्हणजे त्यांचे जन्म गावच असे सर्वांना वाटत होते. पुणे जिल्ह्यात एकूण 27 वर्षे सेवा केली. शैक्षणिक वर्ष 2017 या वर्षी त्यांच्याकडे इयत्ता पाचवीचा वर्ग होता. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण २४ विद्यार्थी बसले होते त्यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याच्या यादीत पाच विद्यार्थी मेरिटमध्ये आलेत. २०१७ च्या निकालानुसार पुणे जिल्हा परिषदेतर्फे सरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. दिनांक ५ सप्टेंबर २००० मध्ये त्यांना तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषद येथे मे २०१८ रोजी सुरगाणा तालुक्यात रुजू झाले. सप्टे. २०१९ साली चांदवड तालुक्यात केंद्र -सोग्रस शाळा - चिखलीवस्ती येथे ६ वर्ष उत्कृष्ठ सेवा / नोकरी कर्म. पुढे कर्मधर्म संयोगाने बागलाण प्रांतात जि.प. प्राथ.शाळा - सबस्टेशन (ताहाराबाद ) येथे ऑक्टो. २०२५ रोजी बदलीने झाली. या शाळेतही सरांनी उत्कृष्ठ विद्यार्थी घडविण्याचा आपला संकल्प सुरूच ठेवला आहे. त्यांच्या या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांना दि. १५/०३/२०२६ रोजी नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक यांच्या निवड प्रक्रियेतून मराठी भाषेला समृद्ध करणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.तात्यासाहेब शिरवाडकर ( वि. वा.शिरवाडकर ) यांच्या जन्म गावी पद्मश्री पुरस्कार प्राप्त तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते तसेच नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. त्यांची धर्मपत्नी सौ. मंदाकिनी खैरनार यांची त्यांच्या या कार्यात मोलाची साथ लाभली.