दिंडोरी। मनोज पाटील:- अवघ्या पाच दिवसावर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तयारीला लगबग सुरु झाली आहे. मंडळ उभारणीसह विविध परवाने मिळविणे, देखावा, मुर्तीचा पाठपुरावा करणे आदी कामांत कार्यकर्त्यांची तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवाचे काऊंटडाऊन सुरु झाल्याने उत्साह वाढत आहे. सार्वजनिक मंडळांनी धार्मिक देखाव्यांवर भर दिला आहे. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक होणार असल्याने द्राक्षनगरीत यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
दिंडोरी तालुक्यातील विविध ठिकाणी गणरायाच्या स्वागतासाठी बाळगोपाळ सज्ज झाले असून त्यासाठी अनेक मंडळे तयारीला लागले आहे. यंदा गणरायाचे जंगी स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी अनेक मंडळे तयार झाल्याने गणराया आनंदाने विराजमान होणार आहे.गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे नागरिकांसाठी एकप्रकारे महापर्वणीच मानली जाते. अनेक ठिकाणी गणरायाचे भव्य स्वागत करून विराजमान केले जाते. यंदा गणरायाचे आगमन पाच दिवसावर येऊन ठेपले असुन अनेक मंडळाकडून विविध रंगाच्या व विविध अवस्थेतील गणेश मूर्तीना मागणी होत आहे. त्यासाठी भाविक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन गणेश मुर्तीकार त्यात्या पध्दतीच्या मुर्ती नागरिकांना बनवून देत आहे. यंदा गणरायाच्या मुर्तीच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने गणरायाचे आगमन थोड्याफार प्रमाणांवर महागडे ठरणार आहे. तसेच सजावट साहित्य, थर्मकाँल, लाईटिंग माळा, विविध प्रकारचे वस्त्र आदींच्या किंमती गगनाला भिडल्याने थोड्या फार प्रमाणावर गणेश भक्तामधुन नाराजीचे सुर निघत आहे. यंदा ग्रामीण भागातील बाळगोपाळांमध्ये गणेशोत्सवाचे मोठे आनंदमय वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे सध्या बाळगोपाळ गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदा महाकाल, मल्हार, लालबागचा राजा, शिव अवतार भुज, शिवलिंग धारक गणेश, तसेच विविध आकर्षक मुर्तीं यांना मोठी मागणी वाढली आहे. सध्या एक गाव एक गणपती हे समीकरण दुर्मिळ झाले आहे. याउलट आता प्रत्येक चौकाचौकात विविध गणेश मंडळे तयार झाल्याने एकाच गावात अनेक गणपती बाप्पा विरजमान होणार आहे. सध्या पावसाळी वातावरण चांगले असल्याने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर आकर्षक होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा प्रत्येक मंडळे आपल्याकडे भाविक मंडळी कसे आकर्षित होतील यासाठी ऐतिहासिक देखावे, निर्सग रम्य, धार्मिक, सामाजिक, सैनिक आदी आकर्षक देखावे निर्माण करून आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहु लागले आहे.