बाऱ्हे - नामदेव पाडवी :- जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने सुरगाणा तालुक्यातील केळावण गावा शेजारील निसर्गरम्य भिवतास धबधबा येथे आयडियाझम संस्थेच्या वतीने भिवतास महोत्सव - २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र व गुजरात राज्यातील २१ कला पथकातील ३०० आदिवासी कलाकारांनी यात सहभाग नोंदवून आदिवासी नृत्यकला सादर केल्या. डोंगऱ्यादेव, माधळ्या, डेरा, कांबड गाणे, डाका, पावरी, तुर, ढोल, ठाकर नृत्य अशा विविध आदिवासी पारंपारिक कला प्रकारांचे सादरीकरण आदिवासी कलाकारांनी केले.
आदिवासी क्रांतिकारक प्रतिमा पुजन तसेच वृक्ष लागवड करत बा-हे पोलीस ठाण्याचे सहा. पोली. निरी. प्रदिप गिते, बा-हे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदिवासी कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मोठ्या जल्लोषात कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदिवासी पारंपारिक पोशाख, नैसर्गिक साहित्याचा वापर करून तयार केलेली वाद्य, कलाकारांचा पहाडी, मधुर आवाज यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी परिसरातील स्थानिक नागरिक व भिवातास धबधबा बघण्यासाठी आलेले पर्यटक यांची गर्दी उसळली होती. यात खाद्य संस्कृती स्टॉल नागलीची भाकर, उडदाचे बेसन, उडदाची डाळ, कुळीदचा पिठला मिरची ठेचा असे विविध प्रकारचे खाद्य संस्कृतीचे प्रकार तयार करून महिला बचत गटांनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे नारायण गभाले, देविदास कामडी यांनी केले. पोलीस पाटील विजय चौधरी, कैलास चौधरी, सरपंच राजेंद्र निकुळे, संजय पडेर, उपसरपंच श्रीम. दमयंती चौधरी, नामदेव पाडवी, शांताराम महाले, शांताराम चौधरी, चंदर चौधरी यांच्यासह केळावण गावच्या नागरिकांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच वनपाल माया म्हस्के आणि त्यांची वन विभागाची टीम, पोलीस स्टेशन बाऱ्हे यांची संपूर्ण टीम यांच्या विशेष प्रयत्नांनी कार्यक्रम पार पडला.
आदिवासी संस्कृती हि निसर्गाची जोपासना करणारी संस्कृती आहे. आदिवासी नृत्य कला प्रकार हे निसर्ग संवर्धनाचे धडे देते. आदिवासी पारंपारिक कला, नृत्य, वाद्य कलाकार हे ६० ते ७० वयोगटातील आहेत. या नृत्य प्रकारांचे जतन करण्यासाठी, आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी तरुणांनी पुढे आले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहा.पोली. निरीक्षक प्रदिप गिते यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले.
सामाजिक संस्था आयडियाझम संस्थापक नारायण गभाले यांनी सांगितले की, आदिवासी संस्कृती, नृत्य प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. स्थानिक आदिवासी कलाकारांना संस्कृतीची जोपासना करण्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध झाले पाहिजेत, यासाठी संस्था भिवतास महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करत राहणार आहे.
जलदूत देविदास कामडी यांनी उपस्थितांशी बोलताना सांगितले की,
भिवतास धबधबा हे पर्यटन स्थळ वन विभागामार्फत उत्तमरीत्या विकसित केले गेले आहे. येथे पर्यटकांची गर्दी वाढावी. येथील स्थानिक आदिवासी रोजगाराच्या संधी याच ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी भिवतास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयडियाझम तसेच जलपरिषद मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भिवतास कला महोत्सव कार्यक्रमाला कुठेही गालबोट न लागता यशस्वीपणे पार पडला त्यामुळे आयडियाझम तसेच जलपरिषद मित्र परिवाराच्या वतीने पोलीस ठाणे बा-हे, वनविभाग बाऱ्हे, ग्रामस्थ केळावण यांचे विशेष आभार मानले.