दिंडोरी। प्रतिनिधी :- वर्षभर शेतात बळीराज्या बरोबर राबणार्या सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण दिंडोरी शहरासह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांची सायंकाळी गावातून मिरवणूक काढून मारुती मंदिरासमोर सलामी देवून त्यांना घरी आणून महिलांनी औक्षण करत पुरणपोळीचा नैवैद्य दाखवण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध व प्रशासन तसेच सहाय्यक मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी आपल्या वनारे गावी बैलपोळा हा पारंपारिक सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्यात आला.
शेतात राब-राब राबताना बैल धन्याची सोबत कधी सोडत नाही. समृद्धीचे गाणे गाताना कधी थकत नाही. म्हणूनच बैलशक्तीच्या पूजेला भारतीय कृषिप्रधान संस्कृतीत वेगळे महत्त्व आहे. बळीराजा आपल्या ‘सर्जा राजा’ वर मनापासून प्रेम करतो. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो. अशा या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी या भावनेतून शेतकरी दरवर्षी पोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. सकाळीच दुथडी भरून वाहणार्या नद्या-नाल्यांतून बळीराजांनी आपल्या बैलांना न्हाऊ घातले. त्यानंतर दुपारी विविध रंग, सजावटीचे साहित्य वापरून, फुलांच्या माळा घालून बैलांना सजवण्यात आले. शेतकर्यांनी आपआपली बैले व अन्य जनावरे मिरवणुकीने गावातील ग्रामदैवताला नेत असल्याचे चित्र होते. शिंगाना बेगडे शेबे घालून तसेच आकर्षक रंगबिरंगी झुलीसुध्दा घालून सजवले होते. गतवर्षीच्या मानाने सजावटीच्या साहित्यामध्ये दहा ते बारा टक्के वाढ झाली आहे. मात्र, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे उत्साहाने बैलांना सजावटीसह रंगवून पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या पारंपारिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. संध्याकाळी बैल वाजत गाजत आणुन त्यांना पुरणपोळी भरविण्यात आले. ग्रामीण भागात तर बैल नसलेल्या कुटुंबानी मातीच्या बैलाच्या मूर्तीची पुजा केली. यावेळी बैलांना नैवद्य दाखवून गोड पुरण पोळी खाऊ घातली. याप्रमाणे पोळा सण उत्साहात करण्यात आला.