बोरगाव l प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यातील अलंगुण जवळील हातरुंडी पैकी तळपाडा येथील रहिवासी मयत सुमतीबाईं चिमण दळवी वय ६५ या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत पोलीस पाटील मधुकर गावित यांच्या कडून समजलेली माहिती अशी की सुरतीबाई हि महिला ता.२१ ऑगस्ट रोजी चार ते पाच वाजेच्या दरम्यान दातरीचापाडा येथे लेकीकडे जाण्यासाठी निघाली होती.तळपाडा येथे नार नदीवर पूल नसल्यामुळे
नार नदीच्या पात्रातून उतरत असतांना पाय घसरुन पाण्यात पडली.दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच असल्याने नार, पार या नद्यांना पुर आला आहे. या पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संध्याकाळच्या सुमारास मुलगा चंद्रकांत हा आई नेमकी कोठे गेली म्हणून गावात इतरत्र शोधा शोध करीत होता. कोणीतरी सांगितले की ती दातरीचापाडा येथे मुलीकडे जायला निघाली होती. तेथे संपर्क केला असता सुरतीबाई आली नसल्याचे सांगितले. आज २२ ऑगस्ट रोजी शोध घेतला असता तळपाडा येथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील कोल्हापूरी सिमेंट बंधा-यातील लोखंडी प्लेटला मृतदेह अडकून असल्याचे आढळून आले.याबाबत तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षाला तसेच पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. तहसिलदार रामजी राठोड यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.पश्चात दोन मुले एक मुलगी पती असा परिवार आहे.