अलंगुण । कृष्णा पवार :- सुरगाणा तालुक्यात दिवसेंदिवस भात शेती करीता मजूरांची टंचाई, वाढलेली मजूरी, औषधे, खते, बी बियाणे करीता येणारा न परवडण्या जोगा खर्च यावर मात करण्यासाठी अलंगुण येथील प्रयोगशील शेतकरी वसंत बागुल यांनी आपल्या माळरान जमीनीत आंबा लागवडीचा एक अनोखा प्रयोग केला आहे.
दोन कलमामध्ये साधारणपणे पंधरा बाय पंधरा फुटांच्या अंतरावर पंधरा एकरामध्ये अडीच हजार केसर कलमी आंब्याची रोपे लावली आहेत. तीन वर्षांपूर्वी लागवड केलेली रोपे फळबागेत चांगलीच जोमाने वाढली आहेत. बागुल हे फळबागेची चांगली काळजी घेत असून खत, पाण्याचे नियोजन करीत आहेत. तालुका कृषी अधिकारी यांचे पथकाने फळबागेस भेट देत पाहणी करुन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, मंडल कृषी अधिकारी अनिल भोर, उप कृषी अधिकारी विलास भोये, सहाय्यक कृषी अधिकारी संगीता चौधरी, हेमलता गायकवाड, गुलाब भोये, सुनील गवळी, भास्कर चौधरी यांनी फळबागेत कीड रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आंबा बागेमध्ये तन नियंत्रण ठेवणे याबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यात फळबाग योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा लागवड करीता अनुदान देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यापुर्वी काही शेतकर्यांनी बांधावरचा हापूस आंबा परदेशात निर्यात झाला होता. या पासून प्रेरणा घेऊन आंबा फळबाग लागवड केली आहे. गुजरातचे व्यापारी जागेवर येऊन आंबा खरेदी करतात. हापूस आंब्याला चांगलीच मागणी दरवर्षी होत आहे. त्यामुळे आंबा लागवड केली आहे.
- वसंत बागूल
फळबाग शेतकरी
केसर,, हापूस आंबा उच्च प्रतीचा निर्यातक्षम दर्जेदार उत्पादन होत असते. कोरडवाहू जमिनीवर तयार झालेला हापूस आंबा हा चविष्ट,रुचकर व मधील गर हा टिकाऊ असतो त्यामुळे तो जास्त दिवस टिकतो त्यामुळे दिवसेंदिवस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. शेतकर्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे.
- ज्ञानेश्वर तिखे
तालुका कृषी अधिकारी