वैभव पगार l दिंडोरी:- दिंडोरी तालुक्यातील तळेगांव दिंडोरी येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दिनांक ९ ऑगस्ट २०२५ ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ व भक्तांच्या वतीने मोठ्या भक्तिभावात उत्साहात संपन्न झाला.
या ज्ञानयज्ञाचे कथाव्यास मठाधिपती आचार्य श्री गोपीराज महानुभाव संस्थान शेळावे, जि. जळगाव , महाराष्ट्रभूषण भागवताचार्य प.पू. गुरुवर्य श्री संकेत बाबाजी महानुभाव यांनी केले.
गुरुवर्यांनी आपल्या अमृतमय वाणीतून भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीला, धर्मसंस्थापनाचे कार्य व जीवनमूल्यांचा संदेश भाविकांना दिला.
गोवर्धन पर्वत उचलून निसर्गाचा समतोल राखणे, कालीय दमनातून जलशुद्धीचा संदेश, द्रौपदी वस्रहरण प्रसंगातून भाऊ-बहीण नाते आणि श्रद्धेची शक्ती, तसेच गीतेतील अन्यायाविरुद्धचा निर्भय संदेश यांची प्रात्यक्षिक उदाहरणे जिवंत देखावे सादर करून कथेमधून त्यानी समजून सांगितली.
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी तळेगाव नगरीतून श्री गोपालकृष्ण भगवानाच्या पवित्र पाषाण मूर्तीची व गुरुवर्यांची भव्य शोभायात्रा निघाली. वाजत गाजत घोडा,रथ, पालखी घेऊन गावांतील विविध भागात शोभायात्रा पोहचली.ठिकठिकाणी पालखीचे व बाबांचे पूजन करण्यात आले.या वेळी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. शोभायात्रेत महिला व पुरुष भक्तांनी फुगडी खेळत उत्सव साजरा केला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होत होती.
१६ ऑगस्ट रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनाने भागवत कथेचा समारोप करण्यात आला. यावेळी बाबाजींनी समाजातील जातिभेद व उचनीचता दूर करून सर्वांना एकत्र आणणारा संदेश दिला. जगतवंदनीय श्री गोपालकृष्णाने गोपालांमध्ये शिदोरीचा काला पदार्थ वाटला आणि समाज प्रबोधनाचा अनोखा दाखला दिला.
या ज्ञानयज्ञ सोहळ्यामुळे तळेगाव दिंडोरी परिसर भक्तीमय व आध्यात्मिकतेने न्हाऊन निघाला.गावातील सदभक्त कथा कार्यक्रम यात वेगवेगळ्या भूमिकेत वेशभूषा सह सहभागी झाले होते. यांना बाबा चे मार्गदर्शन लाभले.त्यामुळे भक्तांना जिवंत देखावे बघायला मिळाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तळेगांव दिंडोरी येथील महानुभाव पंथाचे सर्व युवक भक्त व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.