दिंडोरी । मनोज पाटील :- शेतकर्यांसाठी आनंदोत्सवाचा असणारा बैलपोळा हा सण अवघ्या एका दिवसांवर आला असून शेतकर्यांनी बैलांना सजविण्यासाठी साहित्य दिंडोरी बाजारपेठेत गर्दी केली आहे.
मागील मे व जून महिन्यात पावसाने थैमान घातले होते. शेतकर्यांनी निराशा बाजूला ठेवत बैलपोळ्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी दि. 22 रोजी हा सण साजरा होत असून त्यानिमित्ताने बैलांना सजविण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र, सजावटीच्या साहित्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्यामुळे हे साहित्य खरेदी करताना बळीराजा आखडता हात घेत आहे.शेतकर्यांसाठी आनंदोत्सवाचा असणारा बैलपोळा हा सण अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. यादिवशी शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, कपाळाला बाशिंग, गळ्यामध्ये घुंगरमाळ, आकर्षक रंगाने केलेली सजावट, पाठीवर टाकलेले झूल अशा विविध साहित्याने सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. बैलांना सजावण्यासाठी आवश्यक असणार्या साहित्याने दिंडोरीची बाजारपेठ सजली आहे. बाजारात शिंगदोरी, कासरा, मणीमाळ, शिंगगोंडा, म्होरकी, वेसण, भोंडे, रेशम, घंटी, घुंगरे, तोडे, घुंगर माळ, मुथळी, पट्टे, गोंडाखंडा, बाशिंग, पितळी शिंबी, प्लास्टिक शिंबी, पितळी तोडा, पायातले पैंजण, पाठीवर टाकण्यासाठी झूल, रंग, फुले, शिंगाला लावण्यासाठी हिंगोळ अशा विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. बैलाची सजावट करण्यासाठी असणारे साहित्य तयार करताना लागणार्या कच्चा मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या साहित्याच्या किंमती जवळपास 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. साहित्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरी शेतकरी आपल्या बैलांना सजावटीचे साहित्य खरेदी करतांना दिसत आहे.