दिंडोरी l मनोज पाटील:- भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, वनारे येथे देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य प्रभातफेरीने झाली. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण स्काऊट गाईड गणवेश परिधान केला होता, तर हातात तिरंगी झेंडे घेऊन “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा देशभक्तिपर घोषणांनी गाव दुमदुमून गेले.
प्रभातफेरीदरम्यान ग्रामपंचायत, वनारे येथे गावाचे प्रथम नागरिक व सरपंच मा. श्री. दिपकभाऊ झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून तिरंगी झेंड्यापर्यंत श्रीमती गावित मॅडम यांनी आकर्षक रांगोळी काढली होती. श्री सहारे सर यांनी पुष्पचक्र, तर श्री चौधरी सर यांनी फलक लेखन करून परिसर अधिक सुंदर सजवला.
शाळेचे ध्वजारोहण माजी सरपंच सदूभाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. नामदार श्री नरहरी झिरवाळ यांच्या सौभाग्यवती चंद्रभागाबाई झिरवाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी उप सरपंच प्रकाश भरसट व सर्व ग्रामपंचायत सदस्य,शा. व्य. समिती अध्यक्ष हरिदास झिरवाळ, उपाध्यक्ष दिलीप झिरवाळ व सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, पालक व तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत स्वातंत्र्य दिनावरील मनोगते मांडली. त्यानंतर संगीतबद्ध कवायतीचे प्रात्यक्षिक व सुंदर लेझीम नृत्य सादर केले. पालकांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे दिली.
कै. विमलबाई नारायण जाधव सोनजांब यांच्या स्मरणार्थ वनारे गावातील प्रगतशील शेतकरी सविता मोहन पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा कलर टी-शर्ट वाटप केले. विद्यार्थी आनंदाने भारावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट, सोनपापडी व चिवडा पॅकेट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संदीप चौधरी , दिनेश सहारे , गीता गावित, सोनी भोये, मोहना आई व संगीताताई यांनी परिश्रम घेतले.