महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अवकाळी अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त; ८०% द्राक्षबागा नष्ट* *आंबेवणी सोसायटीकडून मंत्री व प्रशासनाला कर्जमाफी, शेतसारा माफीसह तातडीच्या दिलास्यासाठी निवेदन*

दिंडोरी l प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मे महिन्यापासून पडणाऱ्या अनिश्चित पावसामुळे कांदा, द्राक्ष, सोयाबीन, भात, मका तसेच भाजिपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून त्यांच्या हातात काहीही उरले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे आंबेवणी , घोडेवाडी , वरखेडा व परिसरात ८०% पेक्षा जास्त द्राक्षबागा यंदा आल्या नसल्याने शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक फटका बसला आहे.
     या गंभीर परिस्थितीचा तातडीने विचार करून आंबेवणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन मोहन वडजे, व्हा. चेअरमन प्रविण गांगुर्डे आणि सचिव रामनाथ सवंद्रे यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले. 
हे निवेदन अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. श्री.नरहरी सिताराम झिरवाळ यांच्या वतीने आदिवासी महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे आणि तहसिलदार मुकेश कांबळे यांनाही सोसायटीतर्फे निवेदन सुपूर्द करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, महसूल विभागाचे शेतसारा, शिक्षणकर, वा. शिक्षणकर, रोजगार हमी कर, जमीन महसूल पूर्णपणे माफ करावा, अवकाळी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पिकांची योग्य पंचनामे करून भरघोस प्रमाणात आर्थिक मदत द्यावी, नाशिक जिल्हा हा देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने केंद्र व राज्य सरकारने संवेदनशीलतेने आणि तातडीने निर्णय घ्यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.‌

प्रतिक्रिया 
१) शेतकरी अडचणीत आहे म्हणजे संपूर्ण गाव अडचणीत आहे. या वर्षी द्राक्ष, कांदा व इतर पिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून मन हेलावून गेले आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवाळखोरीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकरी उभा राहणे कठीण होईल. त्यांच्या डोळ्यातील वेदना आम्ही जवळून पाहिल्या आहेत. आम्ही सरकारला योग्य तो निर्णय घेण्याची विनंती करीत आहोत."
 *चेअरमन :- मोहन वडजे* 

२) नाशिक जिल्हा हा देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण आज तोच कणा दुबळा झाला आहे. अवकाळी पावसामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा संसार डळमळीत झाला आहे. ८० टक्के द्राक्षबागा न आल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून तात्काळ कर्जमुक्ती जाहीर करावी हीच अपेक्षा."
 *व्हा. चेअरमन :- प्रविण गांगुर्डे* 

३) शेतकऱ्यांनी वर्षभराच्या आशेने पिके लावली, परंतु अवकाळी पावसाने सर्व स्वप्ने पाण्यात गेली. शेतीचे नुकसान इतके मोठे आहे की त्यांच्या हातात काहीही उरले नाही. या कठीण काळात सरकारने मदतीचा हात दिला नाही तर परिस्थिति हाताबाहेर जाईल. आमचे निवेदन हे शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज आहे."
 *सचिव:- रामनाथ सवंद्रे*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने