ननाशी | प्रतिनिधी:- दिंडोरी तालुक्यातील बाडगीचा पाडा शिवारातील गट नंबर ५८ मध्ये तात्याबा तुकाराम गायकवाड यांच्या शेतातील सुमारे 30ते 35 फूट खोल विहिरीत मंगळवार (दि.16) आठ ते नऊ महिन्यांचा नर बिबट्या पडल्याची घटना घडली. सकाळी शेतात गेलेल्या नागरिकांना विहिरीत हालचाल दिसून आल्याने त्यांनी पाहणी केली असता बिबट्या अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच ननाशी वनपरिक्षेत्र अधिकारी,कर्मचारी व वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विहिरीच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला. बिबट्या जखमी होऊ नये तसेच नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत काळजीपूर्वक राबविण्यात आले.
वनविभागाने पिंजरा, दोरखंड, शिडी तसेच आवश्यक सुरक्षा साहित्याच्या साहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. विहीर खोल असल्याने व बिबट्या घाबरलेला असल्यामुळे रेस्क्यूमध्ये अडचणी येत होत्या. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयम राखत सुमारे तीन ते चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरीत्या विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले.
बिबट्याला बाहेर काढल्यानंतर तात्काळ पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले असून कोणतीही गंभीर इजा नसल्याचे आढळले. प्राथमिक उपचारानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला ननाशी वनपरीक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या यशस्वी रेस्क्यूमुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी वनविभागाच्या तत्परता व कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. दरम्यान, शेतातील उघड्या विहिरींमुळे वन्यप्राण्यांसह जनावरांनाही धोका निर्माण होत असल्याने अशा विहिरींना तातडीने संरक्षक कठडे किंवा जाळी बसवण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ननाशीच्या वनपरीक्षेत्र अधिकारी श्रीमती.एस एस.मुसळे,वन परिमंडळ अधिकारी जे.ए.आमलूक,वनरक्षक लक्ष्मण गायकवाड,जगदीश चौधरी,मनोज गावंडे, गणेश आहिरे,कृष्णा गांगोडे,
आर.पी.गायकवाड, प्रमिला गावित यांचेसह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.