बाऱ्हे l नामदेव पाडवी :- सुरगाणा एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम (IVDP) अंतर्गत शासकीय आश्रम शाळा, आंबुपाडा (बे) ता. सुरगाणा, जि. नाशिक येथे इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर जनजागृती व व्यावसायिक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र सकाळी ११.०० ते दुपारी १.१५ या वेळेत उत्साहात पार पडले.
हा कार्यक्रम LTIMindtree Foundation यांच्या सौजन्याने (Sponsored by) राबविण्यात आला असून त्याची अंमलबजावणी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन (Pratham InfoTech Foundation) यांच्या वतीने करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करणे हा होता.
सत्राचे मार्गदर्शन व्यावसायिक सहकार्य प्रशिक्षक श्री. शुभम सोनकांबळे (क्राफ्ट इन्स्ट्रक्टर) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना १०वी व १२वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधी, कौशल्याधारित अभ्यासक्रम, आयटी व इतर व्यवसाय क्षेत्रातील करिअर पर्याय, तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. योग्य करिअर निवड करताना स्वतःच्या आवडीनिवडी, क्षमता आणि संधी यांचा विचार कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला आश्रम शाळा आंबुपाडा बे मुख्याध्यापक श्री अलबाड सर यांचे सहकार्य व प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, सुरगाणा टीम उपस्थित होती. तसेच PIF चे ऑपरेशन लीड श्री. वैभव दिवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले आणि सत्राबद्दल समाधान व्यक्त केले.
या करिअर जनजागृती व व्यावसायिक मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळाले असून भविष्यातील शिक्षण व करिअर निवडीबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. “योग्य मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्याकडे” या संकल्पनेनुसार राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.