महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आडगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

बा-हे l नामदेव पाडवी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आडगाव (भु) आयोजित एकल महिला व इतर भगिनी यांचा हळदी कुंकू उत्सव शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आडगाव (भु) येथे पार पडला.
     कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आडगाव (भु) ग्रुप ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच रेखाताई गावित उपस्थित होत्या. तसेच पी एम गायकवाड, महाले विस्तार अधिकारी पंचायत समिती पेठ , निकम सर मुख्याध्यापक, हरिदास भुसारे, भाऊसाहेब गायकवाड ग्राम विकास अधिकारी, यादव भुसारे, तुकाराम भोये ग्रामपंचायत सदस्य, नेताजी गावित उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे सर्व पाहुण्यांचे शाल,नारळ व श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर डावखर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. विद्यार्थिनींनी पाहुण्यासाठी सुरेख स्वागतगीत गायले. गायकवाड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मुलगी शिकली, प्रगती झाली या उक्तीप्रमाणे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा उद्देश व त्यात समाविष्ट योजनांची माहिती दिली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देखील उच्चशिक्षण कसे घ्यायचे व नव्या पिढीला एक दिशादर्शक मार्गदर्शन त्यांनी केले. जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने महिलाही मोठ्या उस्ताहाने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आडगाव ग्रुप ग्रामपंचायत तर्फे महिलाना दैनंदिन जीवनात वापरता येणारे जेवणाचे ताट, आणि कुंकवाची कुहिरी भेट देण्यात आली. सर्व महिलांनी सुंदर उखाणे घेतले. जवळपास शंभरहून अधिक महिला तसेच किशोरवयीन मुली कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमास आडगाव (भु) आश्रमशाळा शिक्षक व वर्ग चार कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव शिक्षक आणि आडगाव भु ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गोदाबाई खुरकुटे, छाया भांगरे, अनुसया वाघमारे,योगिता राऊत, चंद्रकला पोटिंदे, माधुरी गायकवाड, विजया निकम, हेमलता खुरकुटे, व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक्षिका डावखर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने