दिंडोरी l प्रतिनिधी : स्वच्छता सेतू प्रकल्पांतर्गत पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशन यांच्या आर्थिक सहाय्याने आणि इकोसॅन सर्विसेस फाउंडेशन यांच्या सहकार्याने कादवा म्हाळुंगी, पाडे आणि निगडोळ येथे पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा २४ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पर्नोर्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशनच्या दिल्ली येथील असिस्टंट मॅनेजर (सीएसआर) आयुषी पांडे, नाशिक प्लांटमधील संदीप मेहता, संदीप फुके आणि शरद नागरे, तसेच इकोसॅन सर्विसेस फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता सेतू प्रकल्पांतर्गत निगडोळ गावासाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. या सुविधेमुळे ग्रामस्थांना स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध झाली असून, गावातील स्वच्छता व आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. उघड्यावर शौचास जाण्याची समस्या कमी होऊन गावातील स्वच्छ वातावरण राखण्यास हातभार लागणार आहे. कादवा म्हाळुंगी येथील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी द्रोण व पत्रावळी बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला असून, त्यासाठी महिला विकास केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्रामुळे महिलांना एकत्रितपणे काम करण्यासाठी जागा मिळाली असून, त्यांच्या कौशल्यविकासासोबतच उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. पाडे येथील तुळजाभवानी शेतकरी बचत गटाला गांडूळ खत प्रकल्प देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सेंद्रिय कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करता येणार असून, शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर सेंद्रिय खतy उपलब्ध होणार आहे. यामुळे जमिनीची सुपीकता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पिकांची उत्पादकता सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्याची शक्यता आहे. कादवा म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संपूर्ण इमारतीचे रंगकाम करण्यात आले असून, शाळेत बाला पेंटिंग साकारण्यात आले आहे. आकर्षक रंगकाम व शैक्षणिक चित्रांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शाळेचा परिसर आनंददायी व विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी पोषक झाला आहे. या उपक्रमांमुळे स्वच्छता, महिला सक्षमीकरण, सेंद्रिय शेती आणि शालेय विकासाला चालना मिळाली आहे. या कार्यक्रमास ईएसएफचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आदित्य भेडसगावकर, प्रकल्प व्यवस्थापक सानिका घळसासी, सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ईएसएफच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपैकी तृप्ती पाटील, ओम डोकफोडे, गायत्री चव्हाण आणि सुमेध मोरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. शेवटी वनारवाडी येथील उपसरपंच दत्तू भेरे, पत्रकार बापू चव्हाण व ग्रामपंचायत अधिकारी समाधान शेवाळे, कादवा म्हाळुंगी येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी जाधव सर, पाडे येथील माजी सरपंच नरेंद्र पेलमहाले व ग्रामपंचायत अधिकारी देवकर सर, तसेच निगडोळ येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी थविल मॅडम उपस्थित होते.