ननाशी | विनोद गायकवाड :- गजानन महाराज शैक्षणिक व क्रीडा मंडळ देवळा संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ननाशी येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिन तसेच राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार, त्यांचे देशासाठीचे योगदान तसेच युवकांसाठी दिलेला प्रेरणादायी संदेश यावर भाषणे केली. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांमधून राष्ट्रभक्ती, शिस्त, आत्मविश्वास आणि चारित्र्यनिर्मितीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान प्रा.एन.व्ही.गरुड आणि प्रा.पी के आहेर यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम, संयम व आत्मविश्वास आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी सुसंस्कारित व जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गायकवाड आणि पल्लवी बोधले विद्यार्थिनींनी केले.तर आभार प्रा.एस.डी.पवार यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व नवचैतन्य निर्माण झाले. यावेळी.प्रा.के.पी.देवरे, प्रा व्ही.एन.सूर्यवंशी, प्रा.ए.टी.पगार, प्रा.भोकनळ, प्रा.शीतल सोनवणे -भामरे,प्रीतम सावंत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.