पालघर l सौरभ कामडी :- मोखाडा तालुक्यातील पुलाचीवाडी ते धोंडमाऱ्यांचीमेट या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती.
रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत आई गावदेवी फायटर यांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. ग्रामस्थांनी एकत्र येत आवश्यक साहित्याची व्यवस्था करून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती, खडी व इतर साहित्य टाकून ते बुजवले.
या श्रमदानामुळे पुलाचीवाडी ते धोंडमाऱ्यांचीमेट या मार्गावरील वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, संबंधित प्रशासनाने या रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी डागडुजी व मजबुतीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाचा असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.