अलंगुण l कृष्णा पवार:- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक श्री रविंद्रजी माने, प्रकल्प संचालक ( आत्मा ) श्री अभिमन्युजी काशिद यांच्या शिस्तबध्द, सुक्ष्म नियोजन आणि मार्गदर्शनाखाली दिनांक 13 फेब्रुवारी ते 15 फ़ेब्रुवारी 2026 या कालवधी दरम्यान सप्तरंग जिल्हास्तरीय कृषि कला व क्रिडा महोत्सवाचे महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये कला व क्रिडा प्रकारात नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यानी उत्स्फ़ुर्तपणे सहभाग घेतला होता. अत्यंत खेळीमेळीच्या आणि प्रचंड उत्साहात, खिलाडु वृत्ती जोपासत सदर महोत्सव संपन्न झाला.
दैंनदिन शासकिय कामकाज करित असतांना अशा प्रकारचे कला व क्रिडा महोत्सव आयोजित करुन अधिकारी कर्मचारी यांच्यातील ताण तणाव काही प्रमाणात दुर होण्यास मदत होते.
या सप्तरंग जिल्हास्तरीय कृषि कला व क्रिडा महोत्सवाच्या उदघाटन समारोह मध्ये पथसंचलन सादर करतांना आदिवासी परंपरा पैकी भोवाडा उत्सवाचा परिचय समाजाला, जगाला व्हावा आणि हि परंपरा मागे पडु नये या उद्देशाने श्री. हरिभाऊ गावित सहाय्यक कृषि अधिकारी यांच्या संकल्पनेतुन व नियोजनातुन आदिवासी परंपरा – भोवाडा उत्सवाचे सादरीकरण करण्यात आले. या भोवाडा उत्सवामध्ये आदिवासी राजा - रावण ताटी, व शेंद-यासुड, तारकासुर मुखवटे, परंपरीक संबळ वाद्य व आदिवासी पोषाखातील नृत्य आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरले. विशेष बाब म्हणजे मा. जिल्हाधिकरी महोदय यांचे समोर दोनदा सादरीकरणाची संधी मिळाली. आणि अंतिमत: सुरगाणा तालुक्यातील आदिवासी परंपरा – भोवाडा उत्सव संचलनास प्रथम क्रमांकाने पुरस्कृत करण्यात आले.
सदर पथसंचलन सादर करतांना रावण ताटी – भास्कर चौधरी, शेंद-यासुड मुखवटा – नामदेव भोये, तारकासुर मुखवटा – रामदास पाडवी, इंद्रदेव – हरिभाऊ गावित यांनी भुमिका केल्या. तर मंडळ कृषि अधिकारी श्री अनिल भोर यांनी भोवाडा उत्सवाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तालुका कृषि अधिकारी सुरगाणा यांचे कार्यालयातील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी उत्स्फ़ुर्त्पणे सहभाग घेतला होता.
तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष खो खो मध्ये सुरगाणा तालुका उपविजेता तर वैयक्तिक क्रिडा प्रकारामध्ये संतु वार्डे 400 मिटर धावणे –प्रथम क्रमांक, लता गागरे 100 मिटर धावणे – द्वितीय क्रमांक, कमल गायकवाड 200 मिटर धावणे – तृतीय क्रमांक तर कोमल गावित यांनी कॅरम मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.
सदर कला क्रिडा महोत्सव यशस्वी पणे पार पाडण्यासाठी तालुका कृषि अधिकारी सुरगाणा श्री ज्ञानदेव तिखे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषि अधिकारी श्री हरिभाऊ गावित, श्री चंद्रकांत गावित, श्री. योगिराज धामोडे, श्री. विनायक कुवर, श्री राजेंद्र साबळे, श्री नामदेव भोये श्रीमती राधा सहारे, उपकृषि अधिकारी श्री यशवंत महाले, श्री. पकज माळी, श्री अशोक बागुल, श्री संजय बहिरम, कमल गायकवाड व मंडळ कृषि अधिकारी श्री अनिल भोर यांनी परिश्रम घेतले.