महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जागतिक महिला दिनानिमित्त बा-हे पोलीस स्टेशन कडून कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

बा-हे l नामदेव पाडवी :- जागतिक महिला दिनानिमित्त बा-हे
पोलीस ठाण्याच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा तसेच मोफत पोलीस भरती प्रशिक्षण विद्यार्थीनी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत बा-हे लोकनियुक्त सरपंच श्रीम. वैशालीताई गावित, माजी जि.प.सदस्य गोपाळराव धुम, माजी पं.स. सभापती मनिषा महाले, ग्रामपंचायत सदस्य देविदास गावित, छाया जाधव, यमुना गायकवाड,  ग्रामविकास अधिकारी श्रीम. सविता गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
      हुंडाबळी, बालविवाह थांबविणे, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि लिंगसमानतेच्या गरजेवर भर देण्यासाठी व्याख्यान आयोजित केले पाहिजेत. या दिवशी स्त्री शक्ती, आत्मविश्वास, शिक्षण, सुरक्षा आणि निर्णयाक्षमता या विषयांवर चर्चा करून महिलांना सक्षम करण्याचे आवाहन करणे, महिलांनी स्वतः आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी होणे, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे, आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, सुरक्षिततेबद्दल जागरूक राहणे आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यास प्रेरित करणे. स्त्री शिक्षणाचे महत्त्व, महिलांचे आरोग्य, बचत गट आणि आत्मनिर्भरतेवर भर देणे. 
लिंगभेद दूर करणे, पुरुषांनीही महिलांच्या स्वप्नांना आणि कामाला मान देणे, तसेच कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात समान संधी मिळवून देणे. विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचे उदाहरण देऊन तरुण पिढीला प्रेरणा देणे. स्त्री ही शक्ती, सहनशीलता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. ती सक्षम असेल, तर समाज आणि देश सक्षम होईल असे अनमोल मार्गदर्शन ग्रामसखी श्रीम. कावेरी महाले यांनी केले.
           जागतिक महिला दिन वर्षभर साजरा झाला पाहिजे. महिला घरात काम करून परिवाराला पुढे नेणाऱ्या गृहिणीचा सन्मान होणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, रमाबाई आंबेडकर, प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला, कविता राऊत, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अशा विविध कर्तृत्ववान महिलांचे आपल्या भारत देशाला योगदान मिळाले आले. त्यामुळे यांचे चांगले विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात रूजवणे गरजेचे आहे. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिला संघटित होणे गरजेचे आहे. महिला कुटुंबाचा कणा आहे. घरातील महिला जागृक असल्यास त्या कुटुंबाची वाटचाल योग्य दिशेने होते. मोबाइलमुळे अल्पवयीन मुले-मुलींकडून चुकीचे पाऊल पडत आहे. यासाठी पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करुन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. महिलांना समानतेची वागणूक मिळावी, महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. परंतु महिलांना मिळणाऱ्या हक्कासाठी लढा द्यावा लागतो, ही खेदाची बाब आहे. आजही शिक्षणापासून मुली वंचित राहतात. सन्मानाची वागणूक दिल्यास खरा जागतिक महिला दिन साजरा होईल. स्त्री जन्माचे स्वागत करुन मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन बाऱ्हे पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी केले.
        जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील श्रीम. निर्मला पळंजे, निर्मला जाधव, कौशल्या बागुल, अधिक्षिका श्रीम. नयना बागुल, अंगणवाडी सेविका श्रीम. जिजा चौधरी, पुष्पा जाधव, निर्मला महाले, आशा कार्यकर्ती उषा वार्डे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच मोफत पोलीस प्रशिक्षण विद्यार्थी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने