दिंडोरी l प्रतिनिधी:- दिंडोरी तालुक्यातील गुरुकुल माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा, करंजी येथे इंडियन डेंटल असोसिएशन (IDA), देवळाली शाखा व चाइल्ड सर्व्हायव्हल इंडिया (CSI) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात 98 विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार विद्यार्थ्यांना औषधांचे वितरण करण्यात आले आणि दात व तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व, योग्य पद्धतीने दात घासण्याची पद्धत तसेच नियमित दंत तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात डॉ. किशोर मुळे, डॉ. श्रुती भामरे, डॉ. प्राची देवरे, डॉ. अदिती सोनवणे, डॉ. स्नेहल भिंगर्डे आणि डॉ. अमोल महालेकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.
या कार्यक्रमास CSI चे कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या दंत आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.