महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वलखेड येथे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध जनजागृती उपक्रम

वलखेड l प्रतिनिधी:- चाईल्ड सव्हाईव्हल इंडिया, परनॉड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, वलखेड ग्रामपंचायत आणि वलखेड उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वलखेड येथे जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
      या कार्यक्रमात गर्भवती व स्तनदा मातांमध्ये स्तनपानाचे महत्त्व, योग्य पोषण आणि बाल आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पौष्टिक आहार स्पर्धा, "योग्य जोडी लावा" हा माहितीपर खेळ, स्तनपानासाठी योग्य स्थितीचे प्रात्यक्षिक व डॉक्टरांचे मार्गदर्शन, आशा सेविकांमार्फत जनजागृती, तसेच स्तनपान समर्थनासाठी स्वाक्षरी अभियान अशा उपक्रमांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पौष्टिक आहार स्पर्धेत उत्कृष्ट व संतुलित आहार तयार करणाऱ्या तीन महिलांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
      यावेळी गावाचे सरपंच हिरामण पाटील, पत्रकार नारायण राजगुरु, वलखेड उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा उघडे, आरोग्य सेवक पंकज भुसारे, चाईल्ड सव्हाईव्हल इंडिया संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर जितेंद्र अहिरे, मेडिकल ऑफिसर डॉ. सोनाली पाटील, फार्मासिस्ट पवन सोनवणे, हेल्थ एज्युकेटर प्रियंका चव्हाण व प्रवीण बैरागी, तसेच गावातील आशा वर्कर सुनीता चारिस्कर व पूजा जाधव, अंगणवाडी सेविका अनिता गायकवाड, धनश्री माळेकर, मदतनीस कविता माळेकर, अलका राजगुरु, माधुरी राजगुरु आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कार्यक्रमाच्या माध्यमातून "आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम पोषण" हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थितांनी स्तनपानाला प्रोत्साहन देण्याचा आणि प्रत्येक माता व बाळाला योग्य सहकार्य करण्याचा संकल्प केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने