दिंडोरी l प्रतिनिधी:- मजुरीचे पैसे दिले नाहीत या रागातून एका २९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे घडली आहे. योगेश रघुनाथ लहांगे (वय २९, रा. गोळशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादी अशोक रघुनाथ लहांगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता मजुरीच्या पैशांच्या देण्याघेण्यावरून वाद झाला. यावरून संशयित आरोपी अशोक म्हसु गायकवाड (वय ४२, रा. गोळशी) आणि किशोर हरी गांगोडे (वय ४४, रा. फोपळवाडे) यांनी संगणमत करून योगेशच्या डोक्यात धारदार हत्याराने तीन जबर वार केले.
घटनेनंतर आरोपी किशोर याने योगेश दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला. मात्र, कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता योगेश गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्यास तातडीने उमराळे आरोग्य केंद्रात व नंतर आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार, अल्ताफ शेख, हरिश्चंद्र पाडवी, प्रदीप शिंदे व पथक या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत,