महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पेठमध्ये शाळेची भिंत कोसळली; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन

बा-हे | प्रतिनिधी :- पेठ तालुक्यातील पाहुचीबारी येथील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जीर्ण इमारतीचा काही भाग भूकंपाच्या धक्क्यांनंतर कोसळल्याने २६७ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत प्रवेश न देण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून, सध्या तात्पुरत्या ठिकाणी वर्ग भरविण्यात येत आहेत.
     नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री 10 वाजून 1 मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनंतर रविवारी सकाळी पाहुचीबारी शाळेच्या इमारतीच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीच्या आठ खोल्यांच्या जुन्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे शाळेची इमारत आधीपासूनच धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे.
     या गंभीर प्रश्नाकडे पाहुचीबारीचे सरपंच रमेश चौरे उपसरपंच नामदेव पाडवी तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीदरम्यान त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शाळेच्या जीर्ण व धोकादायक इमारतीची संपूर्ण माहिती दिली.
    “यापूर्वी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जुन्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले होते. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना तुलनेने सुरक्षित खोल्यांमध्ये बसविले जात होते. मात्र, शनिवारी रात्रीच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे एका भिंतीचा काही भाग कोसळला,” अशी माहिती उपसरपंच नामदेव पाडवी यांनी दिली.
     पाहुचीबारी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सुमारे २६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परिसरातील सुमारे पाच किलोमीटरच्या अंतरातील १० गावांमधून विद्यार्थी या शाळेत येतात. त्यामुळे शाळेच्या इमारतीचा प्रश्न हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे.
शाळेची धोकादायक इमारत विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात आली असून, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गावातील घरात तात्पुरते वर्ग भरविण्यात येत आहेत. कायमस्वरूपी नवीन शालेय इमारत उभी होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

*कंटेनर क्लासरूमचीही तयारी*
या प्रकरणाची दखल घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध निधी तसेच सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नवीन इमारत तयार होईपर्यंत गरज भासल्यास कंटेनर क्लासरूमची व्यवस्था करण्याचाही पर्याय त्यांनी सुचविला.
त्यामुळे पाहुचीबारी शाळेतील २६७ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता प्रशासन किती तत्परतेने सोडवते, याकडे पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने