दिंडोरी - प्रतिनिधी :-दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळूंगी येथील कर्तबगार पोलिस पाटील अर्चना एकनाथ अनवट पाटील यांची नाशिक जिल्हा पोलिस पाटील संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीमुळे तालुक्यासह महसूल व पोलीस प्रशासनातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नुकताच पार पडलेला हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, चिंतामण नाना मोरे, शंकर तुंगार, नाशिक जिल्हाध्यक्ष खताले पाटील आणि सम्राट पाटील यांच्यासह संघाचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.
संघाच्यावतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष अर्चना अनवट पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, अर्चना अनवट पाटील यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रशासनाला नेहमीच मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना जिल्हा पातळीवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पोलीस पालाकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावी वाचा फुटेल आणि त्यांच्या संघर्षाला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना, संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून सर्व पोलीस पाटीलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया अर्चना अनवट पाटील यांनी दिली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.