महाराष्ट्र ट्रायबल न्युज

तीन महिन्यांतच डांबरी रस्त्याची चाळण!निकृष्ट कामाचा आरोप; ठेकेदार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा थेट सवाल

मनखेड l हंसराज भोये :-पळसन फाटा ते म्हैसमाळ फाटा रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधलेला रस्ता अवघ्या तीन महिन्यांत उखडला! रस्त्यावरील डांबर निघून ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
   रस्ता बांधल्यानंतर इतक्या कमी कालावधीत त्याची दुरवस्था होत असेल, तर कामाच्या गुणवत्तेची तपासणी नेमकी कशी झाली? काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कोणी दिले? आणि सार्वजनिक निधीतून झालेल्या या कामाची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
आश्वासनांचा रस्ता की खड्ड्यांचा?
   उद्घाटनाच्या वेळी दर्जेदार रस्त्याची आश्वासने दिली जातात; मात्र काही महिन्यांतच रस्ता उखडत असेल तर आश्वासन आणि प्रत्यक्ष काम यातील फरक तपासण्याची वेळ आली आहे, अशी नागरिकांची भूमिका आहे.
     ठेकेदाराला देयक अदा करण्यापूर्वी गुणवत्ता चाचणी झाली का? संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली का? कामाच्या अंदाजपत्रकानुसार आणि तांत्रिक निकषांनुसार रस्ता बांधण्यात आला का? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी होत आहे.
    सार्वजनिक निधीतून उभारलेला रस्ता तीन महिन्यांत खराब होत असेल, तर हा केवळ रस्त्याचा प्रश्न नाही; हा जनतेच्या पैशांच्या योग्य वापराचा प्रश्न आहे.
संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याची तांत्रिक गुणवत्ता तपासावी, आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
   “तीन महिन्यांत रस्ता उखडला, मग गुणवत्ता तपासणी झाली होती तरी कशी अशी मागणी जोर धरू लागली आहे, तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दाखल घेऊन त्या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन शेडण्यात येईल अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. 

प्रतिक्रिया- हा रस्ता मंजूर होऊन प्रदीर्घ कालावधीनंतर करण्यात आला मात्र अवघ्या तीन महिन्यातच पूर्ण रस्ता उघडून निघाला,  आता प्रशासन मौन सोडणार का? रस्त्याची तांत्रिक तपासणी होणार का?
दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित होणार का? आणि जनतेच्या पैशांचा हिशेब जनतेसमोर मांडला जाणार का?
या प्रश्नांची उत्तरे आता कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष कारवाईतून मिळण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. 
(अशोक भोये ग्रामस्थ बिजुरपाडा)

प्रतिक्रिया- तीन महिन्यामध्येच रस्त्याची दुरवस्था भयानक होत असेल तर हे मटेरिअल बाहेर देशातून मागवता का, ह्या कामाच्या ठेकेदाराला वारंवार तक्रार करून सुद्धा खूप दुर्लक्ष करत आहे त्याची बोलण्याची भाषा उर्मट आहे त्यामुळे ह्या कामाची तत्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन अटळ आहे.     ( भगवान गवळी ग्रामस्थ बिजुरपाडा)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने