खोटारविहिर/अलंगुण l प्रतिनिधी:-"दुष्काळाच्या अंधारातही आशेचा दिवा तेजाळणारी, बळीराजाची यंदाची दिवाळी" हे ब्रीद वाक्य घेवून आयडीयाझम सामाजिक संस्था, नाशिक तसेच वेल्स ऑन व्हील्स सामाजिक संस्था आणि मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी महोत्सव -२०२६ चे आयोजन करण्यात आले. संस्थेने या वर्षीची दिवाळी चिंचपाडा (श्रीभूवन), ता. सुरगाणा येथील आदिवासी शेतकरी कुटुंबांसोबत साजरी केली. या महोत्सवासाठी मविप्र समाजाचे शिक्षणाधिकारी तसेच समाजकार्य महाविद्यालय नाशिकचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, आयडीयाझम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण गभाले तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खूप अवघड जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या याच दुखाला आनंदात बदलण्यासाठी संस्थेने हा दिवाळी महोत्सव आयोजित केला. चिंचपाडा गावातील महिलांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते. आणि या वर्षीचा दुष्काळ पाहता पाण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यात महिलांच्या पुढे बरीच आव्हाने निर्माण होणार आहेत. म्हणून वेल्स ऑन व्हील्स संस्था आणि आयडीयाझम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिलेसाठी जलचक्री ड्रम चे मोफत वाटप करण्यात आले. त्यासोबतच किराणा साहित्यामध्ये साखर, रवा, तेल, बेसन, मैदा, चिवडा, सोनपापडी, पणत्या, आकाशकंदील इत्यादीचे वाटप केले गेले. तसेच शाळेतील मुलांसाठी वह्या, पाट्या, टिफिन बॉक्स, पाणी बॉटल, रंगपेटी, चित्रकला वही, पेन, पेन्सिल, नकाशे, अभ्यासाचे तक्ते, खाऊ तसेच आरोग्याच्या दृष्टीने कोलगेट, ब्रश, साबण, तेल, कंगवा अशा भरपूर वस्तू वाटप करण्यात आल्या. दिवाळी चे औचित्य म्हणून लहान मुलांसाठी फटाके तसेच अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. गावातील तरुणींसाठी, महिलांसाठी संस्थेच्या स्वयंसेविका विद्यार्थिनी यांनी महिला आरोग्यावर चर्चासत्र घेत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप केले.
“आदिवासी सांस्कृतिक परंपरेचे जतन आदिवासी समाज अतिशय उत्कृष्ठपणे करत आहे. इतर समाजावर आता आदिवासी संस्कृतीचा सकारात्मक प्रभाव पडत आहे, हि अतिशय आनंदाची बाब आहे. आदिवासी समाजाचे या संकृतीचे जतन अशाच पद्धतीने करत राहावे तसेच सामाजिक संस्थांनी शाश्वत विकासाच्या दृष्टीने, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आदिवासी भागात विकास कामे करत रहावे,” असे मत या डॉ. विलास देशमुख यांनी मांडले.
“सुरगाणा, पेठ या भागात बरीचशी मुले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत नाहीत, अर्धवटच शिक्षण घेतात. यामुळे बऱ्याच तरुणांना विविध समस्या सामोरे जावे लागते. यासाठी आयडीयाझम संस्था पुढील काळात शिक्षणावर मोठ्या प्रमाणात काम करेल. तसेच आदिवासी भागात बरीच ठिकाणे पर्यटन म्हणून विकसित होवू शकतात तर त्यासाठी गावाने एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी संस्था सर्वोतोपरी मदत चिंचपाडा तसेच इतर गावांना करेन”, असे आश्वासन संस्था अध्यक्ष नारायण गभाले यांनी दिले. तसेच दिवाळी महोत्सवासाठी मदत केलेल्या दात्यांचे देखील त्यांनी आभार मानले.
दिवाळी महोत्सव कार्यक्रम आयडियाझम सामाजिक संस्था, वेल्स ऑन व्हील्स सामाजिक संस्था आणि मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. संस्थेच्या तसेच महाविद्यालयाच्या सर्व स्वयंसेवकांनी सुरुवातीला संपूर्ण गावाची स्वच्छता केली. रांगोळी काढून, फुलांची सजावट आणि पणत्या लावून संपूर्ण गावाची सजावट केली गेली. लहान मुलांनी फटाके फोडत, नाचकाम करत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केला. गावातील उपस्थित महिला पुरुषांना संस्थेने भेट म्हणून आणलेले साहित्य वाटप केले. गावातील आदिवासी कलापथकांनी विविध आदिवासी नृत्य सदर केले. तसेच शाळकरी मुलांनी देखील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. गावातील सर्व लहानथोरांनी, उपस्थित पाहुण्यांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. संपूर्ण कार्यक्रमानंतर गावातील लोकांनी पाहुणे व संपूर्ण गावासाठी भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. संस्थेच्या या उपक्रमामुळे सर्व गावात आनंद पसरला होता. सर्व शेतकरी, कष्टकरी आदिवासी महिला, पुरुष दुष्काळ विसरले होते, पिकांचे झालेले नुकसान विसरले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, आत्मिक समाधान होते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून संस्थेतील स्वयंसेवक देखील भारावून गेले होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नारायण गभाले, संकेत बिडगर, अजय हांडे यांनी केले. आदित्य राजपूत, पवन शिंदे, संकेत धेनक, माधुरी डंबाले, पुजा बिडगर, सचिन आसम, सुशांत भोसले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले. महोत्सवासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, शहाज मेमन, अजय देवरे यांनी वेळोवेळी संस्थेला सहकार्य करत मार्गदर्शन केले. तसेच समाजकार्य महावियालायाचे विद्यार्थी तसेच संस्थेचे स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच गावातील यशवंत बंगाळ, भाऊराव बंगाळ, काशिराम चौधरी, चिंतामण राऊत, पोपट भोये, मुरलीधर भोये, मुरलीधर कोल्हे, जिवाला बंगाळ, चंदर बंगाळ, विठ्ठल महाले, गोपाळ ठाकरे, लक्ष्मण बंगाळ यांनी गावपातळीवर विशेष जबाबदाऱ्या घेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. भाऊराव बंगाळ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.