वणी वार्ताहार :- पांडाणे टोल नाक्यावर २५ कि.मी. अंतरावरील सर्वच वाहनांना टोल कर मुक्ती देण्यात यावी अशी मागणी खा. भास्कर भगरे यांनी केली आहे. वणी - सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावानाजीक टोल बूथ वरून दि.१३ मार्च २०२५ पासून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. अचानक सुरू झालेली टोल वसुली त्वरित थांबवावी अशी प्रमुख मागणी घेऊन स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी टोल नाक्यावर जमा झाले. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून दि. १४ मार्च २०२५ शुक्रवारी सकाळी दहा वाजता बैठक घेण्याचे निश्चित केले. दिंडोरी लोकसभेचे खा. भास्कर भगरे स्वतः हजर असले तरी संबंधित विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे. वणी- सापुतारा हा रस्ता गेल्या चार ते पाच वर्षापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अद्यापही रस्त्याचे काम अपूर्ण आहे. दिशादर्शक फलक नाही डिव्हायडर नाही रुग्णवाहिका नाही टोईंग वाहन नाही अशा अनेक आपूर्तता असताना हा टोल वसुली नाका सुरू झालाच कसा ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या सर्व प्रकारची पूर्तता केल्यानंतरच तोल वसुली करावी अशी मागणी केली जात आहे. तूर्तास आधार कार्ड दाखवून वाहन सोडण्यात यावे असा मार्ग काढण्यात आला असून पुनश्च एकदा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचा निश्चय करण्यात आला आहे. याप्रसंगी सभापती प्रशांत कड, दत्तात्रेय पाटील , उत्तम जाधव ,संतोष रेहरे, आनंदा चौधरी , चिंधू पाटील , किरण गांगुर्डे , राकेश थोरात , बाळासाहेब घडवजे, राजेंद्र देवरे, भोजराज चौधरी, वाहन चालक मालक संघटनेचे पदाधिकारी , शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स.पो.नि. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पांडाणे टोल नाक्यावर २५ कि.मी. अंतरावरील सर्वच वाहनांना टोल कर मुक्ती देण्यात यावी अशी मागणी खा. भास्कर भगरे यांनी केली
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0