महाराष्ट्र ट्रायबल न्युज

शिरसगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला

देवडोंगरी l शंकर निंबारे  
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत तब्बल ३२ वर्षांनंतर सन १९९३-९४ या शैक्षणिक वर्षातील इयता सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा नुकताच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अधीक्षक के.डी.पारे व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पिंपरखेड येथील प्राथमिक मुख्याध्यापक आर.के. चौधरी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आश्रम शाळेचे अधीक्षक अरुण बागले यांनी भूषविले. 
  कार्यक्रमाची आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभंग गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यी स्नेहमेळाव्यात विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन शाळेच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ही भविष्यातील विद्यार्थ्यांमधील प्रगतीचे प्रतीक समजावे. माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक संपादन करीत या शाळेचे नाव उज्ज्वल केले अशी प्रतिक्रिया याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात असे अनेक माजी विद्यार्थी मेळावे व्हावेत अशी मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शिरसगाव आश्रम शाळेतील सन २०२४ -२५ या वर्षातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धत सुवर्णपदक व राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडू सानिका चौधरी व राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त खेळाडू लता ढोले हिना टोपले, सांघिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त खेळाडू हिना टोपले, सारिका महाले, सानिका चौधरी, मयुरी लहारे, मोहिनी लहारे या खेळाडू विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवून शाळेचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये रोख रक्कम माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक दिपक भास्कर व अरुण बागले यांचेकडे सुपूर्द केली.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास महाले यांनी केले, सूत्रसंचालन भगवान महाले यांनी केले. तर वसंत राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिरसगावचे पोलीस पाटील शंकर महाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण महाले, उपसरपंच भगवान महाले, माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर महाले, दिलीप भोये आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने