महाराष्ट्र ट्रायबल न्युज

म्हेळुस्केत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व वासरू ठार

म्हेळुस्के l प्रतिनिधी:-म्हेळुस्के ता.दिंडोरी येथे आठ दिवसांच्या अंतरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व वासरू ठार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
     गेल्याच आठवड्यात म्हेळुस्के गावातील इंदिरानगर  येथे वास्तव्यास असणाऱ्या युवराज चव्हाण यांची शेळी बिबट्याने भरवस्तीत घराजवळून फरफटत नेऊन ठार केल्याची घटना ताजी असतांना काल पहाटे भास्कर धुमने यांच्या वस्तीवरून गाईचे वासरू ओढत नेऊन ठार केले.एकीकडे शेतकरी वर्ग नैसर्गिक आपत्तींना तोंड देतोय तर दुसरीकडे बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या  हल्ल्यात पशुधन व प्रसंगी मानवी जीव गमावतोय.सध्या तरी नागरिकांना जगावं कि मरावं ही चिंता भेडसावत आहे.रात्री अपरात्री शेतीपिकांना पाणी देतांना,मजुरांना मजुरी करतांना जीव मुठीत धरून काम करावं लागतंय.भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर नागरिकांचे जगणे मुश्किल होईल यासाठी  शासनाने कायमस्वरूपी व प्रभावी  उपाययोजना राबवावी जेणेकरून बिबट्या पण सुरक्षित राहील व पशुधनासह नागरिकांचेही प्राण वाचतील.
     यासंबंधी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व वासरू ठार झाल्याची माहिती देशदूत टीमच्या वतीने वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक गोरख गांगोडे,चालक राजाराम शिरसाठ यांनी तात्काळ नोंद घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून झालेल्या घटनेच्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांनी देशदूतचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने