दिंडोरी । वैभव पगार
महाराष्ट्र शासनाच्या दुसर्या टप्प्यातील महत्त्वकांक्षी शंभर दिवसाच्या कार्यालीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये महसूल विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालये पैकी अंतिम निवड झालेल्या कार्यालयांची माहिती काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरव्दारेे घोषित करून सर्व निवड झालेल्या अधिकार्यांचे अभिनंदन केले आहे. या मोहिमेमध्ये नाशिक विभागात दिंडोरी प्रांत कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावल्याने दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शंभर दिवस विशेष मोहिमेंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, कार्यालयीन स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर कार्यालयांना सुधारणा व प्रगती करण्यास सुचित करण्यात आले होते. तालुका व उपविभागीय स्तरावर उत्तम कामगिरी करणार्या पहिल्या तीन कार्यालयांचा प्रत्येकी महसूल विभागनिहाय निकाल शासनाने जाहीर केलेला आहे. तालुकास्तरावर शासनाची 29 कार्यालय यासाठी निवडली होती. दिंडोरी उपविभागाने सदर मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून उपविभागातील महसूल विभागाशी संबंधित कार्यालयीन व प्रशासकीय सुधारणा यामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या बाबींवर विशेष जोर देऊन संख्यात्मक व गुणात्मक प्रगती करून आपले सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडे सादर केले होते. नाशिक जिल्ह्यातून सदर मोहिमेमध्ये दिंडोरी उपविभागाची निवड करण्यात येऊन तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला होता. नाशिक विभागामध्ये प्रथम तीन उपविभागांची निवड करण्यात आली. त्यामध्ये दिंडोरी उपविभागात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सदर मोहिमेत तहसीलदार पेठ, दिंडोरी, सर्व नायब तहसीलदार, सर्व कार्यालयीन कर्मचारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल यांनी पूर्ण कार्यक्षमतेने व सक्रियपणे शासनाने नमूद केलेल्या बाबींवर कार्यवाही केली आहे. त्यामुळे सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे व अतुल्यनिय कामगिरीमुळे उपविभागास यश संपादन करता आले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, दिंडोरी व पेठ विभागाचे तहसीलदार,नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी व कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.