देवडोंगरी l शंकर निंबारे :-दि.१३ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी येथील बोरमाळ येथे (दि.१३) रोजी कृषी मंडळ अधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाने कनसरी माता शेतकरी गटाचे अध्यक्ष शंकर निंबारे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपुर्व नियोजन प्रशिक्षण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
खरीप हंगामापुर्व नियोजन, बीजप्रक्रिया, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, नवीन तंत्रज्ञान वापरून नागली, भात पिकाची लागवड, तण व्यवस्थापन तसेच आंबा फळबाग लागवड आणि कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती या खरीप हंगामापुर्व प्रशिक्षण नियोजन बैठकीत देण्यात आली. खरीप हंगामापुर्व नियोजन बैठकीला महिला शेतकऱ्याचा उदंड प्रतिसाद लाभला.
पावसाळा सुरू झाला की खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज होतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी गाव स्तरीय खरीप हंगामापुर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खरीप हंगामापुर्वी शेतीबद्दल उपाययोजना आणि त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमात हरसुल विभागाचे मंडळ कृषी अधिकारी बाबासाहेब कांबळे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत पाटील, कृषी सहायक हरीदास पवार, प्रमोद ढोकचौळे, ग्रामपंचायत अधिकारी सतिश बच्छाव इकोनेट संस्थेचे ग्रामसभासोबती शंकर निंबारे, स्वंयसेवक प्रकाश वळवी, पुष्पा वळवी, यशोदा वळवी, आशा वर्कर अहिल्या वळवी, अंगणवाडी सेविका राधा निंबारे आदी उपस्थित होते. यावेळी कृषी पर्यवेक्षक प्रशांत पाटील यांनी हवामान अनुकूल आंबा फळबाग लागवड (CRA) पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाला पेसा ग्रामसभा बोरमाळ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.