maharashtratribalnews

शरद पवार गटाचे तहसिलदारांना निवेदन

दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दिंडोरीचे तहसिलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. 
     दिंडोरी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिके, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे वीज पडून अनेक जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. काही शेतकर्‍यांचे अजून कांदे काढलेले नाहीत. तसेच इतरही शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, कांदा, भोपळा, दोडका, कारले, आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बेदाणा शेड, शेडनेट, मचिंग पेपर हे हवेने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. अगोदरच शेतीमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकर्‍यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे बँक, सोसायटीचे कर्जाची रक्कम उभी कशी करायची? अशी विवंचना असतानाच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचेे जगणे असह्य केले आहे. तसेच ठराविक कालावधीनंतर पावसाच्या हजेरीमुळे शेती व्यवसायाची पुरती वाट लागली आहे. त्याचप्रमाणे पीक किसान योजनेचे पैसे बँका कर्ज खात्यात वळून घेत असून ते पैसे बचत खात्यात वर्ग करण्यास बँकांना निर्देश द्यावेत. तालुक्यात जंगली प्राणी, तसेच बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात दहशत वाढली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे जखमी झाले आहे. तसेच मानवी वस्तीकडे सुध्दा बिबट्याने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे सर्व गोष्टींकडे लक्ष देवुन त्वरीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष गजनान शेलार, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे, दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे, तालुकाध्यक्ष राहुल उगले, अशोक नाईकवाडे, पराग भगरे, गोरखानाथ धात्रक, गोकूळ काळोगे, सतिश शेळके, नरेंद्र वड, भाऊराव गांगुर्डे, वाल्मिकराव मोगल, जगन्नाथ जाधव, दगू जाधव, संतोष लोखंंडे, बापूसाहेब पाटील, तानाजी पाटील, अंबादास बागूल आदींच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने