दिंडोरी । प्रतिनिधी दि.8
दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वार्यासह सुरु असलेल्या अवकाळी पावसाने कांदा, भाजीपाला, आंबे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे.
दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. यात अनेक वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांब कोसळले. त्याचप्रमाणे घराांसह गोदामावरील पत्रे झडाले, आंबा, कांदा, भोपळा, दोडका, कारले आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे काही गहू काढणीचे बाकी आहे. ते वादळी वार्याने आडवे पडले आहेत. तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहूही भिजला आहे. त्यामुळे लाखो नुकसान झाले आहे. अगोदरच शेतीमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणार्या शेतकर्यांवर आस्मानी संकट ओढवले आहे. शेतकर्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी वर्ग शेतीच्या भागभांडवलसाठी ऊसनवारी, कर्ज काढून शेतीपिके उभे करतात. परंतू दरवर्षी आस्मानी संकट येत असल्याने शेतकर्यांनी ऊसनवारी घेतलेले पैसे फेडायचे कसे? तसेच कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकर्यांसमोर पडला आहे. त्यामुळे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे.