दिंडोरी l मनोज पाटील
अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतातुर झाला असून खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. रानातील पालापाचोळा भिजल्याने नागली, भाताची रोपे तयार करण्यासाठी राबभाजणी (जमीन भाजणे) करण्यावर संकट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
मे महिन्याच्या मध्यावर आदिवासी भागात खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू होते. विशेषतः पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपूरी या तालुक्यांतील शेतकरी भात व नागलीसारख्या परंपरागत खरीप पिकांसाठी जमिनीची मशागत करून राबभाजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ करतात. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे सारे गणित बिघडले आहे. भात व नागलीची बियाणे पेरणी करण्याआधी शेतात राबभाजणी करावी लागते. यामध्ये शेताच्या एका कोपर्यात शेणखत, झाडांचा पालापाचोळा पसरवून पेटविले जाते. तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी शेतात राबभाजणीसाठी शेणखत व इतर साहित्य शेतात पसरून ठेवले होते. मात्र, अवकाळी पावसाच्या अनपेक्षित आगमनामुळे हे सर्व भिजून गेले आहे तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर शेणखतही वाहून गेल्याने आर्थिक फटका बसला आहे. शेतकर्यांना शेणखत विकत घ्यावे लागणार आहे.