महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वणी येथे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भव्य तिरंगा यात्रा

वणी l प्रतिनिधी- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरीकांच्या मृत्यूनंतर देशात उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण दलांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ वणी येथे तिरंगा रॅलीचे आयोजन वणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते.
            युद्ध भुमिवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच देशभक्तीचा उत्साह व्यक्त करण्यासाठी आज, बुधवार दि.२१ सकाळी ९ वाजता वणी येथील जगदंबा देवी मंदिरापासून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शेकडो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत हातात तिरंगा धरून “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” आणि “जय हिंद” अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकला. सर्व धर्मांचे व सर्व राजकिय पक्षाचे लोक या यात्रेत एकत्र आले, ज्यामुळे राष्ट्रीय एकतेचा संदेश दृढ झाला.
         सकाळी ९ वाजता जगदंबा देवी मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा पांचाळ गल्ली, भाजी मंडई, शिंपी गल्ली, संताजी चौक आणि पोलिस स्टेशन मार्गे पुढे सरकली. शेवटी, ग्रामपालीकेजवळ यात्रेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या यात्रेत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यासह सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वधर्मीय सहभागाने या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. “भारतीय सेना जिंदाबाद” आणि “एक भारत, श्रेष्ठ भारत” अशा नाऱ्यांनी वातावरण भारावून गेले. अनेकांनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीपर गीते डिजेवर वाजवली , तर काहींनी सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करणाऱ्या घोषणा दिल्या. ही यात्रा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा उत्सव तर आहेच, शिवाय भारतीय सेनेच्या त्याग आणि समर्पणाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याचा एक प्रयत्न आहे असे वणीचे उपसरपंच विलास कड यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, ही यात्रा म्हणजे आमच्या सेनेप्रती कृतज्ञता आणि देशभक्ती व्यक्त करण्याचा मार्ग आहे.”या तिरंगा यात्रेने वणी शहरात देशभक्तीचा जोश निर्माण झाला असून, राष्ट्रीय एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला आहे. याप्रसंगी हिंदुत्ववादी संघटना व देशप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या यात्रेचे आयोजन वणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने