कळवण । प्रतिनिधी
जेवताना ताटात लोणचे असल्याशिवाय तोंडाला चव येत नाही. असे ग्रामीण भागात म्हटले जाते. वरुणराजाची हजेरी लागण्यापूर्वीच लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग ग्रामीण भागात सुरू झाली आहे. परंतु दिवसेंदिवस गावरान आम्रवृक्षांची कत्तल होऊन कलमीकरणाकडे सर्वाचाच ओढा वाढल्याने बाजारात गावरान कैर्यांची आवक जेमतेम दिसून येत आहे. परिणामी त्यांचे भाव वधारल्याने लोणचे तयार करण्यासाठी लागणार्या गावरान कैर्या आंबट झाल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.
कळवण तालुका हा शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात पावसाळा व हिवाळा ऋतूत कष्टकरी शेतकरी राजा हा दररोजच्या जेवणासोबत आंब्याच्या लोणच्याचा वापर केला जातो. भोजनाचा स्वाद वाढविण्यासाठी विशेष लोणच्यावर अधिक भर दिला जातो. शेतावर जाणारे मजुरवर्ग, कामगार, कष्टकरी भाकरी - मिरची ठेच्यासोबत लोणच्यास विशेष पसंती देतात. सध्या गृहिणी, महिलावर्ग पेरणी कामास वेग येण्यापूर्वी कैरीचे लोणचे बनविण्यासाठीची घाई पुरुष मंडळींना कैरींचा बाजार आणण्याचे ‘फर्मान’ करताना दिसत आहेत. महिलावर्ग कैर्यांसोबतच लोणचे साठविण्यासाठी चिनी मातीच्या बरण्या खरेदी करताना दिसत आहेत. लोणचे घातल्यावर ते चांगले मुरावे म्हणून मातीच्या किंवा चिनीमातीच्या भांड्यात ठेवावे लागते. त्यामुळे लोणचे अधिक चवदार बनते. कैर्या खरेदीपासून तर लोणचे तयार होईपर्यंत यंदा मोठा खर्च येत असल्याने लाडकी बहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
1 लोणचे तयार करण्यासाठी गावरान आंब्यासह प्रामुख्याने घोटी, तोतापुरी, वाटी, खोबरं या नावाच्या कैर्या वापरण्यात जुन्या जाणकार गृहीणी पसंती देतात. घरात लोणचे बनवताना स्वच्छतेवर चांगला भर दिला जातो. अनेक प्रकारची लोणची आज बाजारात उपलब्ध आहेत; पण त्यात घरी बनविलेल्या कैरीच्या लोणच्याची चव नाही.
- सुनिता माणिक सोनवणे, गृहिणी रवळजी
2 लोणचे घालण्यासाठी वापरात येणारे मसालेही यंदा महागले आहे. आंब्याचे कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी लागणारी मोहरी, हळद, मिठ, तेल, तिखट, लसूण, मिरी, लवंग, मेथी, तीळ आदी वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. कैर्यांचेही दर वाढून लोणच्याची चव महागली आहे. परंतु भोजनाचा आस्वाद लोणच्या अभावी हरवल्यागत आहे. रेडिमेड लोणच्याचे दरही परवडणारे नाहीत.
- उषा किशोर पगार, गृहिणी कळवण