दिंडोरी । मनोज पाटील :- मातेरवाडी - जऊळकेवणी रस्त्यावर ( दि. 6 रोजी) सकाळी 11 वाजेच्या सुमारास अक्राळे येथील गावातुन जाणार्या वर्हाडाचा आयशर उलटल्यानंतर आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी झाले आहे. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेने पिंपळगाव बसवंत येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील ग्रामस्थ जऊळकेवणी येथे लग्नाला आयशरमध्ये जात होते. मातेरवाडी - जऊळके वणी रस्त्यावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम चालू होते. या रस्त्यावर साइडपट्ट्या भरलेल्या नसल्यामुळे समोरून वाहन आल्याने वर्हाड्याच्या आयशर चालकाने साईडला आयशर घेत असताना रस्त्याच्या कडेला चाक उतरल्याने आयशर उलटला. या अपघातात आठ ते नऊ महिला व पुरुष जखमी झाले आहे. संग्राम डंबाळे,वनिता डंबाळे, अलका डगळे, सुनिता कोरडे, रामनाथ आचारी, सविता आचारी, अलका बदादे, सुनीता बेंडकुळे, गायत्री पवार हे जखमी झाले. या जखमींना रुग्णवाहिकेनेे पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी अपघाताच्या ठिकाणी जखमींना मदत करण्यासाठी माजी आमदार धनराज महाले हे पण उपस्थित होते.