महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आनंदी सहवासने फुलवला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद;विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

दिंडोरी l मनोज पाटील:-'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे'... हे सुभाषित आपण आजवर अनेकदा ऐकले आहे पण त्याचा अनुभव क्वचितच येत असतो. दिवाळीच्या दिवसात अनेक सेवाभावी संस्था दुर्गम भागात जाऊन विविध वस्तूंचे वाटप करत तिथल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पेरून येतात पण या सगळ्या गरिबीचा पाया हे शिक्षण असून त्यासाठी काहीतरी करायला हवं हा उद्देश किरण सोनार नावाच्या तरुणाला अस्वस्थ करतो पण आपलीच झोळी फाटकी आहे तर आपण कुणाला काय देऊ शकतो या विचाराने तो अधिक अस्वस्थ होतो पण म्हणतात ना- 'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' त्याप्रमाणे सोनार यांनी पत्नी सौ. प्रतिभा यांना सोबत घेत 'आनंदी सहवास' नावाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी सात वर्षांपूर्वी छोटी चळवळ सुरू केली. 
सुरुवातीला सोशियल मीडियातून आवाहन करून जुने दप्तर, सायकल जमा केले नि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले. त्या मुलांचा खुललेला चेहरा बळ देऊन गेला. लोकांची सोबत वाढली. दरवर्षी मागणी वाढली तसे देणारे हातही वाढले. यात कुणी डॉक्टर, इंजिनिअर, छोटेमोठे व्यावसायिक हे तर आहेतच पण अगदी मजुरी करणारेही आहेत. या वर्षी या चळवळीतून किरण सोनार यांनी जवळपास पंचवीस शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पेरला. 
       जिल्हा परिषद शाळा निगडोळ येथील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र उगले, सामाजिक कार्यकर्ते शरद मालसाने यांना या चळवळीची माहिती मिळाली व त्यांनीही यांच्याशी संपर्क केला. शाळेची गरज लक्षात आणून दिली व त्यातून 'आनंदी सहवासने' जि प शाळा निगडोळ येथे येऊन सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या वह्या व इतर लेखन साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा  निखळ आनंद टिपून घेतला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू रहेरे, सरपंच कृष्णा रहेरे, सामाजिक कार्यकर्ते शशीनाना मालसाने, आनंदी सहवासच्या अध्यक्षा सौ प्रतिभा सोनार, किरण सोनार, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी के पी सोनार, कवी प्राचार्य राजेश्वर शेळके, ऑडिटर सोनार  व इतरही सेवाभावी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी किरण सोनार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कवी शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कवितेतून रंजन केले. विद्यार्थ्यांनीही मान्यवरांच्या स्वागतासाठी एक नाट्यप्रवेश सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक निलेश भारती, नितीन पवार, विश्वास आहेर, बळीराम भोये यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने