बोरगाव l प्रतिनिधी:-गुजरातमधील एकमेव आणि अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन असलेल्या सापुतारा येथे आजपासून ‘सापुतारा मॉन्सून फेस्टिव्हल २०२५’चा रंगतदार शुभारंभ झाला. राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक, वन, पर्यावरण व हवामान बदल विभागाचे कॅबिनेट मंत्री मुलुभाई बेरा व डांग जिल्ह्याचे प्रभारी मंत्री कुंवरजीभाई हलपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य महोत्सवाची सुरुवात झाली.
या उत्सवाचे उदघाटन आज सकाळी १० वाजता मंत्री मुलुभाई बेरा यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात १७ ऑगस्ट पर्यंत दररोज नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ थीमवरील परेड, सांस्कृतिक व संगीत महफिली, आदिवासी कलेच्या कार्यशाळा, साहसी व नैसर्गिक पर्यटन, स्थानिक खाद्यपदार्थ, रेन डान्स, सेल्फी पॉईंट आदी आकर्षणे समाविष्ट आहेत.
मंत्री मुलुभाई बेरा यांनी आपल्या भाषणात कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा देत केंद्र सरकारच्या पर्यटनविषयक धोरणांमुळे गुजरातमध्ये पर्यटनाने घेतलेली झेप अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे गुजरात पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचले आहे. २००६ सालापासून गुजरातमध्ये पर्यटनवर्ष साजरे करून राज्याला एक आगळी ओळख मिळवून दिली आहे.”
मंत्री बेरा यांनी “अतिथी देवो भव” या भावनेने प्रेरित होऊन सापुतारा फेस्टिव्हलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा व सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबतही माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी पर्यटकांना ‘लोकल फॉर व्होकल’ मोहिमेला पाठबळ देत स्थानिक कृषी उत्पादनं व हस्तकला वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.
प्रभारी मंत्री कुंवरजीभाई हलपती यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सापुतारा हे पूर्वी एक छोटेसे गाव होते, मात्र आज हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. सरकारकडून आदिवासी बांधवांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारालाही चालना मिळत आहे.”
उदघाटन समारंभात १३ राज्यांतील ११० कलावंतांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोरिओग्राफरच्या नेतृत्त्वात विविध पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले स्थानीय कलाकारांचे डांगी नृत्य, ज्याने उपस्थित पर्यटकांचे मन जिंकले.
या भव्य कार्यक्रमास डांग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाबेन गाईन, सांसद धवलभाई पटेल, आमदार विजयभाई पटेल, माजी आमदार नरेश पटेल, आणि पर्यटक विभागाचे अधिकारी, प्रशासकीय पदाधिकारी, तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते.
सापुताराचे निसर्गसौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि राज्य शासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या मॉन्सून फेस्टिव्हलचे स्वरूप दरवर्षी अधिक भव्य होत आहे.