बोरगाव प्रतिनिधी :- अंबाठा शिवारात भास्कर सुकर पवार यांच्या फॉरेस्ट प्लॉटमध्ये एक अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याबाबत खबरीच्या माहितीवरून सुरगाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची पोलिसांकडून नोंद करण्यात आली आहे.
सदर महिलेचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असून, तिचे नाव व गाव याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. महिलेने अंगात काळ्या रंगाचा टॉप, पिकट खाकी रंगाची लेगीज, आकाषी रंगाची व पांढऱ्या ठिपक्यांची ओढणी परिधान केली होती. उजव्या हातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे मण्यांचे ब्रेसलेट होते. डोक्याचे केस गळून पडलेले असून उंची साडेचार ते पाच फूट, शरीरयष्टी मध्यम बांध्याची आहे.
तिचा मृतदेह पायरीच्या झाडाच्या फांदीला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबादास बैरागी करत आहेत.
ज्यांना सदर महिलेबाबत काही माहिती असेल, त्यांनी तातडीने सुरगाणा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.