महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सायकलवारीतून पंढरपूरची वाट – बापलेकांची ३५१ किमीची श्रद्धायात्रा आणि आरोग्याचा संदेश

दिंडोरी l मनोज पाटील:- वारी... ही केवळ पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीची नव्हे, तर मन, शरीर आणि नात्यांची एक सुंदर परीक्षा असते. हे उदाहरण घालून दिलं प्रा. डॉ. घनश्याम जाधव (वय ४६), उपप्राचार्य, मविप्र कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक यांनी. दिंडोरी तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ. जाधव यांनी आपल्या १६ वर्षीय मुलगा समीक जाधवसोबत नाशिक ते पंढरपूर असा तब्बल ३५१ किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला आणि श्रद्धा, संस्कार, आरोग्य आणि बापलेकाच्या नात्याचा एक विलक्षण संगम घडवून आणला.
ही वारी २० आणि २१ जून २०२५ रोजी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली.
 पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता अनंत कान्हेरे मैदानावरून सायकलवारीची सुरुवात झाली. भगव्या ध्वजांनी सजलेली रांग, डोळ्यांत पांडुरंगाच्या भेटीची ओढ, आणि उत्साही सायकलप्रेमींची गर्दी – वातावरण भक्तिभावाने भारलेलं होतं.
प्रवासाचा पहिला टप्पा नाशिक – सिन्नर – नांदूर शिंगोटे – राहुरी – अहिल्यानगरमार्गे होता. पहाटेच्या कोवळ्या उन्हात सायकलवरील प्रत्येक पेडलसोबत एक नवीन अनुभव, वाटेतील ग्रामस्थांनी दिलेलं पाणी, फळं, चहा, आणि एनर्जी ड्रिंक्स यामुळे थकलेलं शरीर नव्याने सावरत होतं. उन्हाच्या झळा, रस्त्यावरील चढ - उतार,थोडा थकवा – या सगळ्यावर मात करत संध्याकाळपर्यंत ११ तासांत १५१ किमीचा प्रवास पार करून हुंडेकरी लॉन्स, अहिल्यानगर येथे पहिल्या दिवशीचा मुक्काम झाला.
दुसऱ्या दिवशी २१ जून रोजी पहाटे, धुकट गारव्यात दुसरा टप्पा सुरू झाला. समोर होता अजून २०० किमीचा प्रवास. पण पंढरपूरच्या दिशेने जाताना शरीर दमलं असलं तरी मनामध्ये असलेलं श्रद्धेचं बळ हेच खरं इंधन होतं. 
मिरजगाव,करमाळा, टेंभुर्णी या मार्गाने वाटचाल करत अखेर पंढरपूरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. मंदिराबाहेर ‘विठ्ठल... विठ्ठल...’ चा गजर कानावर आला आणि त्या दोन दिवसांतल्या घामाच्या प्रत्येक थेंबाचं सोनं झाल्यासारखं वाटलं.

 वारीतील विशेष आकर्षण ठरला समीक जाधव. १६ व्या वर्षी इतका खडतर प्रवास सायकलवर यशस्वीरीत्या पूर्ण करणं हे नक्कीच प्रेरणादायी ठरतं. वाटेतील गावकऱ्यांनी आणि सहप्रवाशांनी त्याच्या शिस्तीचं, संयमाचं आणि आत्मविश्वासाचं भरभरून कौतुक केलं. 
डॉ. जाधव म्हणतात, “हा प्रवास केवळ शारीरिक तयारीचाच नव्हता, तर मानसिक धैर्याचाही कस होता. समीकचा निश्चय आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील समजूतदारपणा पाहून मला त्याचा अभिमान वाटतो.”
हे सांगताना ते पत्नी अर्चना घनश्याम जाधव यांचाही विशेष उल्लेख करतात – “सामान्य आई असती, तर एवढ्या लांबच्या सायकल वारीसाठी १६ वर्षाच्या मुलाला परवानगी दिली नसती. पण अर्चनाने समीकवर विश्वास ठेवला, त्याच्या क्षमतेवर शंका न घेता खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली – हे तिच्या मनोबलाचं आणि मातृत्वसंपन्न संस्कारांचं उत्तम उदाहरण आहे.”
या वारीतून आरोग्यविषयक एक सकारात्मक संदेशही मिळतो.

 डॉ. जाधव सांगतात, “नियमित सायकल चालवल्यामुळे ताकद, सहनशक्ती, मानसिक ताजेपणा वाढतो आणि शरीर सुदृढ राहतं. मोबाईल-स्क्रीनच्या युगात सायकलिंग मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात नेण्याचं प्रभावी साधन आहे – हेच खरं आरोग्यप्रशिक्षण.”
प्रवासातील एक अविस्मरणीय क्षण सांगताना ते म्हणाले, “दुसऱ्या दिवशी पहाटे अंधारमय रस्त्यावर मुलाच्या पाठीमागे सायकल चालवत असताना, त्याच्या निर्धारानं माझ्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आले. आणि जेव्हा चंद्रभागेत सायकल भिजवली, तेव्हा वाटलं – शरीर थकलं असलं तरी मन तृप्त झालं आहे.”
ही वारी केवळ ३५१ किमीची नव्हती – ती होती मन, शरीर आणि नात्यांची सखोल परीक्षा. ‘ *हिम्मत असेल तर अशक्य काहीच नाही’* हे स्वतःच्या कृतीतून दाखवणारा अनुभव.

 २०२४ मध्ये झालेली पहिली वारी आणि यंदाची दुसरी – दोन्ही वेळा नव्यानं शिकवण देणाऱ्या आणि बापलेकाच्या नात्यात अधिक गहिरेपणा निर्माण करणाऱ्या.
वारी म्हणजे फक्त गाठलेलं पंढरपूर नव्हे – ती असते चाललेलं मन, साथ दिलेलं हृदय आणि बापलेकाचं साक्षात भक्तिरूप नातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने