महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कॉम्रेड कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने

दिंडोरी - संतोष कथार :- महाराष्ट्रातील निसर्ग संपन्न व वनराईने आणि डोंगरदऱ्यांनी प्रसिद्ध असलेला इगतपुरी तालुका, आदिवासी बहुल " महाराष्ट्राची चेरापुंजी" अशी ओळख असलेला, इगतपुरी तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले
छोटसं गाव म्हणजे सांजेगाव!
 गाव अतिशय साधं पण या गावाने संपूर्ण महाराष्ट्राला प्रभावित करणारा एक "लोकोत्तर" नेता दिला ते म्हणजे इगतपुरी तालुक्याचे पहिले आमदार कर्मवीर श्री पुंजाबाबा गोवर्धने.
      3 ऑगस्ट 1890 या दिवशी लक्ष्मण पाटलाच्या घरात माता हौसाबाई यांच्या पोटी हे विलक्षण व्यक्तिमत्त्व जन्माला आलं.
 जन्म, बालपण कष्टात, दारिद्र्यामुळे अल्पशिक्षण, आईने बनवलं, वडिलांनी घडवलं, आईने शब्दांची ओळख दिली, वडिलांनी अर्थ समजावला, आईने विचारांची भक्ती दिली तर वडिलांनी स्वातंत्र्यवृत्ती, लढण्याची प्रेरणाशक्ती, जिंकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे बाबा आपणास माहीत झाले. 
 * बहुजणांचा संसार करणाऱ्या बाबांच्या कार्याचा अल्प परिचय...
 * माणसाच्या जीवनाचा प्रवास कसा असावा? मागे वळून पाहिले तर पावलांचे ठसे दिसावे...
* महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गाडगेबाबा इत्यादींच्या विचारांचा वसा पुढील पिढीला देणारा सर्वसामान्यांचा लढवय्या नेता म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांची नव्या पिढीला ओळख असणं अतिशय गरजेचे आहे.समर्थ नेतृत्व हे सहजासहजी निर्माण होत नाहीत त्याला संघर्षाची झळाळीअसावी लागते. यासाठी शेतकरी, आदिवासी व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी पुंजाबाबांनी आपले सर्व आयुष्य व्यथित केले.
* * राजश्री शाहू महाराज नाशिकला आले होते त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन बाबांनी शिक्षण चळवळ हाती घेतली.
* * शिक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी अतिदुर्गम, आदिवासी वाड्या-पाड्यावर अनेक दौरे केले सर्व ठिकाणी सभा घेऊन मागासलेल्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. "ज्ञानगंगा आली हो दारी" या व्यक्तीप्रमाणे काम केले.
* * सत्यशोधक समाज चळवळीचा बाबांचा कार्यावर प्रभाव महर्षी वि.रा.शिंदे, कर्मवीर रावसाहेब थोरात, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर गणपतराव मोरे, वाघ गुरुजी यांचा सहवास लाभल्याने शिक्षण क्षेत्राकडे ते आकर्षित झाले शिक्षणासाठी भरीव कार्य केले. 
* * शेतकरी, कष्टकरी व आदिवासींसाठी काम करणारा महान तपस्वी 
* * स्वातंत्र्यपूर्वकाळातच पुंजा बाबांच्या सामाजिक क्रांती लढयाला सुरुवात झाली. इंग्रजी सरकार शेतकरी धोरणा विरोधात होते 1945 मध्ये बाबांनी पहिला भात भाव लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात 1947 व 1948 ते 1949 या काळात उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून दोन वेळा सरकार विरोधात पुंजाबाबांनी सहकारी कर्मवीर काकासाहेब वाघ, ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे, रामचंद्र भांगरे, वाळू सोनवणे यांना सोबत घेऊन भाव भात लढ्यात अग्रभागी तर कधी भूमिगत तर कधी जिल्हा बंदी असताना नाशिक ठाणे ( जिल्हा सीमा) सीमेवर झोपडीत राहून चळवळ पुढे चालू ठेवली. शेतकऱ्यांना संघटित करून जो भात भाव लढा दिला तो देशाच्या इतिहासात संस्मरणीय राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवलं गेलं. त्यांच्या प्रत्येक लढ्याला यशाचं कोंदण मिळत गेलं.
* * बाबा स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था त्यांना माहीत होती म्हणूनच जमिनीची विषम वाटणी, दुष्काळ,अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या सुविधा व शेतमालाला नसलेला हमीभाव इत्यादी समस्यांवर बाबांनी जनजागृती केली. त्यांच्या या प्रामाणिक कार्याचा परिपाक म्हणून इगतपुरी तालुक्यातील जनतेने त्यांना विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे केले आणि आमदार म्हणून निवडून दिले. बाबांचा आमदारकीचा कालखंड सन 1957 ते 1962 लोकप्रतिनिधी म्हणून बाबांनी " साधी राहणी व उच्च विचारसरणी " या उक्तीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबरोबरच वैतरणा धरण लढा, भूमीहीनांचा लढा, फायरिंग रेंज लढा उभे करून इगतपुरी परिसरातील सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला शेतकरी व कष्टकरी, शोषित,अंधश्रद्धाळू,पीडित सामान्य माणसाला जीवनात उभे करण्यासाठी त्यांनी शेती,पाणी, वीज,धरणग्रस्त समस्या,रस्ते, शेतीमालास योग्य व रास्त भाव, शिक्षण,लघुउद्योग इत्यादी प्रश्नांवर कळकळीने व तळमळीने विधानसभेत न्याय मागणी केली * भांडवलदारांना व सावकारशाहीला कडाडून विरोध केला. 
* * आम्हा निंदा व वंदा आमचा स्वहिताचा धंदा मानून विज्ञानवादी विचारसरणीनुसारच समाज प्रबोधन उदा. अंधश्रद्धा, जातीभेद निर्मूलन,पारंपारिक विवाह सोहळा, दशक्रिया विधी याऐवजी आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा,सर्वधर्मसमभाव,सण उत्सवात सहभाग, सामूहिक विवाह सोहळे,उत्तर क्रियाकर्मा ऐवजी गोरगरिबांना आर्थिक मदत स्वतःच्या दशक्रियेबाबत सक्त ताकीद कोणताही विधी करावयाचा नाही. योगायोग तसाच घडला. कुठलेही कर्मकांड मान्य नसलेल्या पुंजाबाबांचा अंतिम अंत्यविधी संसारी येथे दारणा नदीच्या तीरावर झाला नदीला रात्री मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि बाबांच्या रक्षा दारणा नदीच्या पुरात वाहून गेल्या. अंतिम संस्कार करण्याऐवजी या खर्चात लोक कल्याणकारी कार्य करावे अशी त्यांची धारणा होती. या धारणेचा सन्मान करत घोटी येथे झालेल्या शोकसभेत तमाम जनतेने व कार्यकर्त्यांनी जवळपास 70 हजार रुपये इतकी मोठी रक्कम जमा करून मराठा विद्या प्रसारक संस्थेला दिली. बाबांना आमदारकीचा जो भत्ता मिळायचा तो देखील जनतेसाठीच बाबांनी खर्च केला तो काळ स्वस्ताईचा होता. बाबांनी ठरवलं असतं तर आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत ते अफाट जमीन जुमला, भौतिक साधनसामग्रीचे जमीनदार मालक असते. परंतु त्यांना स्वार्था ऐवजी परमार्थ महत्त्वाचा वाटत होता. इतका स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ नेता आजच्या काळात सापडणं दुर्लभ आहे.
* * त्यांचे कौटुंबिक जीवनही आदर्श होते. बाबांची पत्नी मंजुळाबाई यांना ते लक्ष्मी म्हणून हाक मारत त्या खरोखरच लक्ष्मीप्रतिरूप होत्या.आठ मुलं परिस्थिती सर्वसाधारण नवरा लोक कल्याणासाठी सतत बाहेर फिरतो या गोष्टीला बायकोने प्रचंड विरोध केला असता परंतु मंजुळाबाईंनी पुंजाबाबांच्या प्रत्येक कार्यात समर्थपणे साथ दिली.घरची सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारली. बाळंतपणानंतर पाचव्या दिवशी जात्याच्या पाळी दळायला बसावं लागत होतं,इतका मोठा परिवार तितक्याच जबाबदाऱ्या, तेराव्या दिवसापासून तर सगळीचं काम करावी लागत.त्यांच्या समर्थ साथीशिवाय हा जनकल्याणाचा रथ पुढे जाणं शक्य नव्हतं. बाबांनी महात्मा फुले यांचे विचार आत्मसात केले होते त्यांनी जातीपातीचा विटाळ कधी मानला नाहीत.श्रेष्ठ,कनिष्ठ असा भेदभाव पण केला नाही. सार्वजनिक वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी लोकांकडून धान्य मिळवून मोफत जेवणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. बाबांनी साम्यवादी विचार आयुष्यभर जोपासले. लोककल्याणाच्या ध्यासाने बाबांना इतकं पछाडलं होतं की नागलीची भाकर त्यावर चटणी सोबत घेऊन, हातात काठी डोक्याला फेटा अशा पेहरावात बाबा सांजेगाव ते नाशिक पायी प्रवास करत फक्त शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी.  
* * वरील सेवाभावी कार्यकर्त्यांना त्यांना गोदूताई परुळेकर, क्रांतीसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव माजी खासदार भाई विठ्ठलराव हांडे व शेतकरी कामगार पक्षाचे मार्गदर्शन बाबांना लाभले. कर्मवीर काकासाहेब वाघ,सावळीराम गोवर्धने, वाळू सोनवणे,लक्ष्मण बोंबले, बनाजी मास्तर, वाघ गुरुजी,गणेश महादेव कुलकर्णी यांचं अनमोल सहकार्य मिळालं.
* * महाराष्ट्र एकीकरण समिती भरीव कामगिरी - डांग जिल्हा महाराष्ट्रालाच मिळावा यासाठी विधानसभेत प्रभावी भाषण,आई व मावशी यांची ताटातूट नको.
* * स्वातंत्र्योत्तर काळात लोक कल्याणकारी राज्य निर्मितीसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्यांपैकी कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने अग्रभागी होते.
* * सत्ता व पैसा यांना दुय्यम स्थान देणारे व्यक्तिमत्व 
* * संपूर्ण आयुष्य गोरगरीब, कष्टकरी, वंचित,आदिवासी समाजासाठी समर्पित करणारे महान विदुषी 
* * संधीच सोनं करणारा लोक कल्याणकारी नेता 
* * नेतृत्वाचा संबंध पितृत्वापेक्षा कर्तृत्वाशी असावा हीच बाबांची शिकवण 
* * नव्या पिढीला नवदिशा देणारे प्रेरणा स्रोत 
* * आमदारकीची दुसरी (टर्म )संधी नाकारणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव आमदार (तरुणांना प्राधान्य द्या )
* * जीवनातला पैलू पाडणारा नेता 
* * चंदनाप्रमाणे झिजणारा नि:स्पृह माणूस 
* * संत व संयमी प्रवृत्तीचा राजकारणी 
* * राजकीय कार्यकर्त्यांचा दीपस्तंभ 
* * कष्टकरी गरीब शोषितांचा कैवारी 
* * जनतेच्या हृदयात स्थान मिळालेली महान शक्ती 
* * आदिवासी बांधवांचा आधारवड 
* * निर्भिड व स्पष्ट वक्ता
* * शेतकऱ्यांचे तारणहार 
* * उच्चतम वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाजकारणी  
* * अंशतः ऋणमुक्तीसाठी मविप्र समाज संस्थेने इगतपुरी महाविद्यालयाचे नामकरण कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय या नावाने केले आहे.
* * इगतपुरी तालुक्यात अनेक सेवाभावी संस्थांनी बाबांच्या नावाने अनेक ज्ञानमंदिर उभारली आहेत.
* * बाबांच्या कार्यातून अल्पशी ऋणमुक्ती होण्यासाठी बाबांचे सर्वात धाकटे चिरंजीव श्री. वसंतराव गोवर्धने यांच्या व परिवाराच्या प्रयत्नांनी श्री.अभिमन्यू सूर्यवंशी लिखित "शेतकरी जेव्हा जागा होतो " ( स्वातंत्र्यानंतरचा पहिला यशस्वी शेतकरी लढा उभारणाऱ्या अज्ञात सेनापतीची संघर्षकथा )
* *" किसान जब जाग उठा " हिंदी आवृत्ती.मूळ लेखक श्री. अभिमन्यू सूर्यवंशी अनुवादक : डॉ. बापूराव देसाई (डी.लीट् )
* * " लढवय्या " लेखिका सुमन हुकूमतराव गोवर्धने 
* *वरील संदर्भ ग्रंथांमधून 
  कॉम्रेड कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांच्या स्मृती निरंतर डोळ्यापुढे राहतील,आजच्या तरुण पिढीला हे संदर्भ ग्रंथ " दीपस्तंभ " ठरतील अशी आशा करतो.
* नशीब नशीब म्हणायचं नसतं कर्तृत्व कर्तृत्व घडवायचं असतं कारण नशीब हे अस्तित्वातच नसतं 
* स्वतःचं उज्वल भविष्य स्वतःच निर्माण करायचा असतं प्रयत्नांनी सारं काही शक्य होत असतं
* कितीही मोठं संकट आलं तरी घाबरून जायचं नसतं 
* संकटांना टक्कर देऊन पुढे पुढेच जायचं असतं
* अपेक्षाला कवटाळून बसायचं नसतं 
* जीव घेण्या प्रसंगातही मस्तक ताट ठेवायचं असतं
* अंधश्रद्धांना तर मुळीच घाबरायचं नसतं, हातावरील रेषेने, बोटामधील अंगठीने, गळ्यातील धाग्या -दोऱ्याने नव्हे तर मनगटातल्या ताकदीने भविष्य घडवायचं असतं 
* हे बाबांनी समाजाला दाखवून दिले. 
* * "देह ऐसा झिजवावा जैसा चंदन व्हावा "
* "आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत रहावा" 
* * हसत, खेळत काम करत प्रत्येक परिस्थितीनुरूप स्वतःला गुंतवून घेत सुखाच्या लहरी निर्माण करणाऱ्या बाबांच्या महान व्यक्तिमत्त्वाला त्रिवार सलाम...
* *शब्दांकन: प्रा. साहेबराव ठाकरे (सेवानिवृत्त)*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने