महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बोरगाव (उंबरपाडा दी) चेक पोस्टवरील गैरसोयींचा विषय ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

बोरगाव l लक्ष्मण बागुल:- बोरगाव (उंबरपाडा दी) येथील महाराष्ट्र सीमावर्ती चेक पोस्ट परिसरातील नागरिक व प्रवाशांना भेडसावत असलेल्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे अधिकृतरित्या निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, चेक पोस्ट परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा वाहनचालक चुकीच्या दिशेने जातात व त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. तसेच, परिसरात शौचालय, पिण्याचे पाणी, वीज/प्रकाश तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणताही हेल्पडेस्क वा आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नाही.
यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन नाही आणि काही कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिक व प्रवाशांना विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
    हे निवेदन उपजिल्हाधिकारी राजपूत यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेत, तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना निर्देश दिल्याचे समजते. विशेषतः गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    निवेदन सुरगाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेन्द्र (राजू) पवार यांच्या पुढाकाराने देण्यात आले असून, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी हेही यावेळी उपस्थित होते. तालुका अध्यक्ष पवार यांच्या पाठपुराव्यामुळे ही गंभीर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आली असून, लवकरच बोरगाव (उंबरपाडा दी) चेक पोस्ट परिसरातील अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    स्थानिक नागरिक व प्रवाशांनी याबाबत सकारात्मक पावले उचलल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून या भागातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने