महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त; संपूर्ण कर्जमाफीची मागणी - खासदार भास्कर भगरे यांचे केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन

दिंडोरी l प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष कांद्यासह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेत खासदार भास्कर भगरे यांनी देत नुकसानीची चर्चा केली.
    या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून सतत पाऊस, तसेच अतिवृष्टीमुळे कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो , भात यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.द्राक्ष हे मोठ्या गुंतवणुकीचे व वार्षिक पिक असताना यंदा अतिवृष्टीने द्राक्ष पिक न आल्याने द्राक्ष उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. कांदा रोपे तसेच कांदा पिक इतर सर्व पिके ही ही खराब झाले आहे.
 त्यामुळे प्रभावित शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे प्रभावित शेतकऱ्यांच्या पीक विमा दाव्यांचे तात्काळ निकालीकरण करावे, महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून केंद्राकडून आर्थिक मदत मंजूर करावी, आगामी हंगामासाठी बियाणे, खत व कीटकनाशकांवर अनुदान वाढवावे, नाशिकसह जलप्रलयग्रस्त भागांसाठी कृषी लवचिकता योजना लागू करावी आदी मागण्यासह नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही शेतकरी वर्गावर ताण निर्माण झाला असून, केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने तात्काळ कर्जमाफी दयावी शेतकऱ्यांना मदत दयावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री चव्हाण यांनी सदर आपत्ती चा अहवाल मागविण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने