बोरगाव l प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यात पोलिसांकडून सोरट जुगार खेळणाऱ्यांवर रोकडपाडा यात्रे प्रसंगी कारवाईदरम्यान गैरकायद्याने जमाव करून शासकीय कामात अडथळा आणत पोलिसांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. यावेळी रतन खांडवी, जयराम खांडवी, मनोहर खांडवी, तुषार खांडवी ,कल्पेश खांडवी, जयराम ची पत्नी पूर्ण नाव माहिती नाही, तुषार ची पत्नी तसेच सुरेश ची पत्नी नाव माहिती नाही राहणार सर्व रोकडपाडा यांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी सोरट जुगार खेळत असलेल्या आरोपी क्र. २ यास रंगेहात पकडून शासकीय वाहन (क्र. MH 15 HQ 9347) मध्ये बसवून नेण्यास सुरुवात केली असता, इतर आरोपींनी गैरकायद्याने जमाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या वेळी आरोपींनी पोलिसांच्या सरकारी वाहनावर दगड, विटा फेकून मोठे नुकसान केले.
तसेच, आरोपींनी फिर्यादी पोलिस व साक्षीदारांना हाताचापटीने मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या गावातील साक्षीदारांनाही “तुम्ही आमची नावे पोलिसांना का सांगितली?” असे म्हणत लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
याच दरम्यान आरोपींनी सरकारी वाहनातील वायरलेस सेट, एम्प्लिफायर, जॅक व व्हील पाना इत्यादी वस्तू चोरून नेल्याचेही उघड झाले आहे. या घटनेबाबत संबंधित पोलिसांनी आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.