महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिंपळगाव केतकी शिवारात बिबट्या जेरबंद

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात दिंडोरीच्या वनविभागाला यश आले आहे. 
    दिंडोरी तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली आहे. अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळगाव केतकी शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. याबाबत वनविभागाकडे या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणी केली होती. वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करुन शितल फर्निचरचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजर्‍यात काल अडीच ते तीन वर्षीय मादी जातीचा बिबट्या अडकला. बिबट्या पकडला गेल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि: श्‍वास टाकला आहे. अजून या परिसरात दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जनावरे गोठ्यात बांधावी, लहान बालकांना एकटे बाहेर पडू नये, रात्रीच्या वेळी बाहेर पडतांना बॅटरीचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसल्यास त्वरीत वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन दिंडोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल अशोक काळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया:- 
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी: नितीन गांगुर्डे
" पिंपळगाव केतकी येथे बिबट्या खूप वर्षांपासून ठाण मांडून आहे. पिंपळगाव केतकी शिवारातील भाऊसाहेब देशमुख यांच्या मळ्यात तीन महिन्यांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. त्याने आतापर्यंत अनेकदा मेंढ्या, कुत्रे ठार केले आहे. वन विभागाला कळल्यानंतर वन विभागाने तात्काळ पिंजरा बसवला व बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. अजूनही बिबट्या आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी."

-नितीन गांगुर्डे, नगरसेवक दिंडोरी नगरपंचायत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने