दिंडोरी - विशेष प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणावर भर द्यावा, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.
बालकांच्या आयुष्यातील पहिले आठ वर्षे मेंदूच्या एकूणच सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचे असतात हे लक्षात घेता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये तीन ते सहा वयोगटातील पूर्व प्राथमिक शिक्षणाला शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवास समाविष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नीपसीड व महिला व बालविकास विभाग यांचे मार्फत शून्य ते तीन वर्षे म्हणजेच गर्भधारणेपासून ते तीन वर्षापर्यंत "नवचेतना "हा अभ्यासक्रम व तीन ते सहा वर्ष वयोगटासाठी "आधारशिला" हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांना "पोषण भी पढाई भी" प्रशिक्षण तालुकास्तरावर देण्यात येत असून नाशिक तालुक्यातील प्रशिक्षणाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे पार पडले. त्याप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडीतील पालकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणावर भर द्यावा असे सांगितले. "पोषण भी पढाई" अंतर्गत आहार व पोषणाच्या सवयी, पोषण ट्रेकर, सक्षम अंगणवाडी ,पोषण 2.SAM,MAM बालकांचे कुपोषण व्यवस्थापन व सूक्ष्म पोषक तत्त्वाची कमतरता इत्यादी बाबत अंगणवाडी ताईंची समज वाढवण्याकरता उत्तम दर्जेदार पूर्व शालेय शिक्षण देण्याकरिता अंगणवाडी केंद्र हे एक अध्ययन केंद्र व्हावे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले. यावेळी जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रताप पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक ग्रामीण सचिन शिंदे यांच्यासह प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.