महाराष्ट्र ट्रायबल न्युज

विज्ञानाला अध्यात्माची जोड द्या – नामदार नरहरी झिरवाळ

ओझे l प्रतिनिधी:-जीवनात प्रगती साधायची असेल तर विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालणे आवश्यक आहे. विज्ञान माणसाला बुद्धिमान बनवते, तर अध्यात्म त्याला माणूसपण शिकवते. या दोन्हींच्या समन्वयातूनच मानवी जीवन अधिक उन्नत होऊ शकते, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले.
     पंचायत समिती दिंडोरी शिक्षण विभाग, निक्स इंग्लिश मिडीयम स्कूल, जनता विद्यालय उमराळे व जिल्हा परिषद शाळा उमराळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
नामदार झिरवाळ पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते शिक्षण न घेता समाजाच्या गरजा ओळखून संशोधन करावे. प्रश्न विचारण्याची सवय, प्रयोगशीलता आणि नवसर्जनशील दृष्टिकोन विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही कोणापेक्षा कमी नसून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, आत्मविश्वास व संशोधन वृत्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर निक्स शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुखदेव परबत, डॉ. पुंडलिक धात्रक, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सी बी गवळी, वंदना चव्हाण, कैलास पगार, केंद्रप्रमुख सीमा भामरे, अनुसया पाटील, नितीन बागुल, गोविंद भोये, तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष डी. जी. वाणी, संजय केदार, घनश्याम चौधरी, शशीभाऊ गामणे, संतोष कथार, संदीप गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी नामदार झिरवाळ यांचे लेझीम पथकाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी राजेंद्र खैरे यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिमेची आकर्षक रांगोळी साकारली.
या विज्ञान प्रदर्शनासाठी सुभाष सोनवणे, अविनाश गुंजाळ, संतोष गांगुर्डे, संतोष जगताप, बाळासाहेब घुगे, संतोष जाधव आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
इन्स्पायर अवॉर्ड विजेता यशराज शिंदे याची जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी येथील मंगला बागुल यांनी शिक्षक कर्मचारी यांच्या विभागीय धावण्याच्या स्पर्धेत यश संपादन करून राज्यस्तरासाठी पात्र ठरल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष डी. जी. वाणी यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नामदार झिरवाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रस्ताविकात गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश समाजाचा उत्कर्ष, संशोधन वृत्तीला चालना देणे व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे हा असल्याचे नमूद केले. यावेळी विविध गटांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, चषक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक संघ,निक्स इंग्लिश निडियम स्कुल,जनता विद्यालय उमराळे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराळे ब्रु येथील मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन डी जी वाणी यांनी केले.

[दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे व सहभागी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच समावेशित शिक्षणाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलला भेट देत इतर राज्यांतील उपक्रमांची माहिती घेत संवाद साधला.]

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने